रिझव्‍‌र्ह बँकेला नवीन बँक परवान्यासाठी अर्ज सादर करावयाची १ जुलै २०१३ ही अंतिम मुदत नजीक येऊन ठेपली असताना, काहीशी नरमलेल्या भांडवली बाजारात सूचिबद्ध बँकोत्सुक बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांचे समभाग चांगला भाव मिळविताना दिसत आहेत. प्रस्तावित बँक म्हणून संक्रमणासाठी सज्ज झालेल्या आणि त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी शेअर बाजारातील कामगिरी एकूण बाजाराच्या तुलनेत सरस राहिली आहे. गेल्या मे महिन्यापासून आजतागायत एकूण बाजाराची कामगिरी नकारात्मक राहिली असताना, या समभागांनी सरासरी दोन अंकी वाढ दर्शविली आहे.