अलाहाबाद बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांची लवकरच उचलबांगडी?

सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर बिगर कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थखात्याने गुरुवारी ही नियुक्ती जाहीर केली.

‘बँक्स बोर्ड ब्युरो’च्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून बँक सुधारणांचाच हा एक भाग असल्याचे वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेवर चरण सिंह, देना बँकेवर अंजली बंसल व सेंट्रल बँक ऑफ इंडियावर तपन रे हे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत.

चरण सिंह हे आंतरराष्टीय नाणेनिधीवर वरिष्ठ अर्थतज्ज्ञ तसेच रिझव्‍‌र्ह बँकेत संचालक म्हणून राहिले आहेत. स्पेन्सर स्टुअर्ट इंडियाच्या संस्थापक असलेल्या अंजली बन्सल यांनी मॅकेन्झी अ‍ॅण्ड कंपनीतही काम केले आहे. तर तपन रे हे यापूर्वी कंपनी व्यवहार खात्यात सचिवपदी राहिले आहेत.

या तीन सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापन बदलाबरोबर सरकार अन्य सरकारी बँकांमध्येही काही प्रमाणात फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामध्ये अलाहाबाद बँकेचाही समावेश आहे. बँकेच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंत सुब्रमण्यन यांचे नुकतेच अधिकार काढून घेण्यात आले आहे.

१४,००० कोटी रुपयांच्या थकीत कर्ज फसवणुकीत उषा यांचे नाव आल्याने सरकारच्या सूचनेनुसार बँकेच्या संचालक मंडळाने ही कार्यवाही केली.

वर्षभरापूर्वीच पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठ पदांमध्ये सरकारने बदल केले होते. बँक व्यवस्थापनाची संघटना असलेली ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ सध्या बँकिंग सुधारणेकरिता सल्लागार नियुक्तीच्या प्रक्रियेत आहे.

वाढत्या थकीत कर्जाचा सामना करावे लागत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २.११ कोटी रुपयांचे भांडवली अर्थसाहाय्य करण्याचे सरकारचे धोरण आहे.

मार्च २०१८ अखेरच्या तिमाहीत अनेक सार्वजनिक कंपन्यांना वाढत्या तोटय़ासह थकीत कर्जापोटी मोठी आर्थिक तरतूद करावी लागली आहे. त्यातही देशातील आघाडीच्या स्टेट बँक व पंजाब नॅशनल बँक या दोन सार्वजनिक बँकांनी त्यांच्या स्थापनेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी तोटा नोंदविला आहे.