कमी तसेच बेभरवशाच्या पावसामुळे देशातील खाद्यान्याचे उत्पादन गेल्या वर्षांच्या हंगामात घसरले असून ते वार्षिक तुलनेत ४.६६ टक्क्य़ांनी कमी झाले आहे.
२०१३-१४ च्या हंगामात खाद्यान्न उत्पादन विक्रमी टप्प्यावर झाले होते. या कालावधीत २६५.०४ दशलक्ष टन खाद्यान्य उत्पादन झाले. मात्र २०१४-१५ च्या हंगामात गहू, तांदूळ, डाळी आदींचे उत्पादन तुलनेत २५२.०४ दशलक्ष टन झाले.

२०१४-१५ आर्थिक वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात, फेब्रुवारी – मार्चमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये बिगर मोसमी पावसाने धडक दिली होती. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला होता.
केंद्रीय कृषी खात्याने २०१४-१५ साठी जाहीर केलेल्या चौथ्या अग्रिम अंदाजानुसार, २०१४ मध्ये झालेल्या कमी पावसामुळे खरिप पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर २०१५ मधील फेब्रुवारी व मार्च दरम्यान झालेल्या बिगर मोसमी पावसाचाही अन्नधान्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला.
२०१४-१५ मध्ये तांदळाचे उत्पादन १०४.८० दशलक्ष टनपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच्या वर्षांत ते विक्रमी २०६.६५ दशलक्ष टन होते. तसेच गव्हाचे उत्पादनही आधीच्या वर्षांतील ९५.८५ दशलक्ष टनच्या तुलनेत यंदाच्या कालावधीत कमी, ८८.९४ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या मेमध्ये केलेल्या अंदाजातही कमी खाद्यान्याची भीती व्यक्त केली आहे. खराब पावसामुळे २०१४-१५ मध्ये खरिप पिकांना फटका बसला असून बेभरवशाच्या पावसामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाले झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील पावसात १२ टक्के तूट नोंदली गेली होती.