27 February 2021

News Flash

धास्तीतून सेन्सेक्सची १९० अंशांनी घसरण

सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकामध्ये सोमवारच्या व्यवहारात मोठय़ा घसरणीसह या घडामोडींचे सावट दिसले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

निफ्टीला ९९०० ची पातळी राखण्यात यश

उत्तर कोरियाची आण्विक खुमखुमी

हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून आपली संरक्षण सज्जता जगाला दाखविणाऱ्या उत्तर कोरियाच्या युद्धखोर खुमखुमीने जगभरातील वित्तीय व्यवस्थेत गुंतवणूकदारांमध्ये धास्ती निर्माण केली. सप्ताहारंभीच स्थानिक भांडवली बाजारातही गुंतवणूकदारांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकामध्ये सोमवारच्या व्यवहारात मोठय़ा घसरणीसह या घडामोडींचे सावट दिसले. त्या उलट मुंबईच्या सराफा बाजारातही मौल्यवान धातूंच्या दरांनी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी उसळी घेतली.

भांडवली बाजारात निर्देशांक घसरण

उत्तर कोरियाने रविवारी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. याचे अपेक्षित पडसाद सप्ताहारंभीच्या व्यवहारात येथे पडले. भांडवली बाजारांच्या प्रमुख निर्देशांकांनी अर्ध्या टक्क्याची आपटी घेतली. गेल्या सलग तीन व्यवहारात तेजी नोंदविणारा सेन्सेक्स १८९.९८ अंश घसरण सोसता झाला. तर निफ्टी ६१.५५ अंशांनी खाली आला. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ३१,७०२.२५ व ९,९१२.८५ वर स्थिरावले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने व्यवहारात ९,९००चा स्तरही सोडला होता.

परकी चलन विनिमय मंचावर सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयाचेही भांडवली बाजारात सावट उमटले. आशियाई तसेच युरोपीय बाजारांमध्येही निर्देशांक घसरणीचे सत्र होते.

वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या समभागांची विक्री करून गुंतवणूकदारांनी सोमवारी नफेखोरीही साधली, असे नमूद करत नियोजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे आनंद जेम्स यांनी गुंतवणूकदारांचा ओढा आता सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जात असलेल्या मौल्यवान धातू, सरकारी रोखे याकडे असल्याचे दिसत असल्याचेही म्हटले आहे.

सेन्सेक्समधील अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी २.६ टक्क्यांपर्यंत घसरले. हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे १.९४ टक्क्यांपर्यंत खाली आले. क्षेत्री निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांकाला घसरणीचा सर्वाधिक, १.३९ टक्क्यांपर्यंत फटका बसला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले.

सोन्याला अपेक्षित झळाळी

उत्तर कोरियाच्या संरक्षण सज्जतेपोटी जगभरातील मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये गेल्या अनेक दिवसांनंतर पुन्हा दरउसळी अनुभवली गेली असून याला भारतातील सोने – चांदीच्या दरांचा कलही अपवाद ठरला नाही. मुंबई सराफ बाजारात सोन्याचा तोळ्याचा दर ३० हजारांपुढे तर चांदीचा किलोचा भाव ४० हजार रुपयांहून अधिक झाला.

आंतरराष्ट्रीय राजकीय अस्थिरतेच्या पाश्र्वभूमीवर प्रमुख लंडनच्या बाजारात सोने प्रति औन्स १,३३६ डॉलरवर पोहोचले आहे. बरोबर वर्षभरापूर्वीच्या उच्चांकाशी त्यांनी यंदा बरोबरी साधली आहे. तसेच चांदीचा दर यंदाच्या एप्रिलनंतर प्रथमच १७.८३ डॉलर प्रति औन्सवर गेला आहे.

परिणामी येथील बाजारातही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये अभूतपूर्व तेजी नोंदली गेली. नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोने प्रति तोळा ३०,११० रुपयांवर गेले. शनिवारच्या तुलनेत त्यात १० ग्रॅममागे एकाच सत्रात ३५५ रुपयांची वाढ झाली.

स्टॅण्डर्डप्रमाणेच शुद्ध प्रकारच्या सोने धातूच्या दरातही सप्ताहारंभी ३५० रुपयांहून अधिक वाढ नोंदली गेली. परिणामी हा धातू १० ग्रॅमसाठी ३०,२६० रुपयांवर पोहोचला. पांढरा धातू म्हणून ओळखले जाणाऱ्या चांदीच्या दरात सोमवारी एकाच सत्रात किलोसाठी तब्बल ६९० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदी किलोमागे ४०,६४५ रुपयांवर पोहोचली.

सोने तसेच चांदीचा सोमवार सत्रअखेरचा दर हा २०१७ मधील सर्वोच्च मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक स्तरावर वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या दरांमुळे ऐन सण-समारंभाच्या तोंडावर सोने-चांदीच्या दरांमध्ये उसळी अनुभवली गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:24 am

Web Title: north korea bomb test hit mumbai stock market
टॅग : Sensex
Next Stories
1 ‘जीएसटी’ अनुपालन बँकांना कर्जपुरवठय़ावर देखरेख आणि वाढीसाठीही उपयुक्त
2 महिंद्र म्युच्युअल फंडाचा पहिल्या वर्षांतच १५० शहरांपर्यंत विस्तार
3 ‘म्युच्युअल फंडातील नव-गुंतवणूकदारांनी जोखीम पातळीशी प्रतारणा करू नये’
Just Now!
X