मोदी सरकारच्या महत्वकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतून अपेक्षित नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकलेली नाही. बहुतांश कंपन्या स्थानिक उत्पादनाऐवजी वस्तुंच्या आयातील प्राधान्य देतात असे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष ए.एम.नाईक म्हणाले. सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमातंर्गत अजून बरेच काही साध्य करायचे आहे असे लाईव्ह मिंटशी बोलताना नाईक म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. मोठया प्रमाणावर नोकऱ्या देशाबाहेर चालल्या आहेत असे नाईक यांनी सांगितले. भारतीय कंपन्या मोठया प्रमाणावर वस्तुची आयात करत असल्याबद्दल नाईक यांनी चिंता व्यक्त केली. भारतीय कंपन्यांकडे अर्थसहाय्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. पण आयातीमध्ये त्यांना उधार, सवलत मिळते. त्यामुळे भारतीय कंपन्यांचा परदेशातून वस्तू आयात करण्यावर भर आहे असे नाईक म्हणाले.

सीएमआयईसह वेगवेगळया वेबसाईटसवरील डाटा पाहिल्यास देशात बेरोजगारी वाढल्याचे दिसून येते. दरवर्षी एक कोटी रोजगार निर्मिती करण्याचा सरकारवर दबाव आहे. ग्राहकांकडून मागणी घटल्यामुळे नोकऱ्या निर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्राहकांकडून मागणी आणि गुंतवणूक कमी झाल्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. चालू तिमाहीत विकासाच्या गतीला चालना मिळेल असे तज्ञांनी सांगितले.

कुशल कामगारांच्या पुरवठयाचा विचार करता उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्मितीमध्ये यश मिळालेले नाही. योग्य कौशल्य आणि नोकऱ्या यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे नाईक म्हणाले. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धामध्ये स्वत:चा फायदा करुन घेण्याची भारतासह अनेक देशांना संधी आहे. सध्या विएतनाम आणि थायलंड या परिस्थितीत आपला फायदा करुन घेत आहेत असे नाईक म्हणाले.