News Flash

सहाराने विदेशी मालमत्ता विक्रीचा प्रस्ताव फेटाळला

सहाराने यापूर्वी अमेरिकेतील मिराच कॅपिटलबरोबर चर्चा केली होती.

| July 28, 2016 07:41 am

सुब्रतो रॉय (संग्रहित चित्र)

विदेशातील तीन मालमत्तांसाठी आलेला प्रस्ताव सहारा समूहाने झिडकारला आहे. या मालमत्तांसाठी गुंतवणूकदाराने सुचविलेली १.३ अब्ज डॉलर ही किंमत कमी असल्याचे निमित्त समूहाने पुढे केले आहे. पक्षकाराने मात्र प्रस्ताव आकर्षक असल्याचा दावा केला आहे.
सहारा समूहाच्या ग्रोसव्हेनर हाऊस (लंडन), पार्क प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन (दोन्ही न्यूयॉर्कमध्ये) मालमत्ता आहेत. त्या विक्रीची प्रक्रिया ही गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात समूहप्रमुख सुब्रतो रॉय हे तुरुंगात गेल्यापासून सुरू होती. रॉय सध्या पॅरोलवर सुटले आहेत.
या तीन मालमत्तांसाठी तीन असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक जेसदेव सागर यांनी प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी १.३ अब्ज डॉलर देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र कतारस्थित गुंतवणूकदारांकडून यापेक्षाही अधिक किंमत मिळत असल्याचा दावा करीत सहाराने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
सागर यांनी मात्र आपण नमूद केलेली किंमत रास्त असल्याचे स्पष्ट केले आहे. तर समूहाने आपल्याला यापेक्षाही अधिक किंमत देण्यास अन्य गुंतवणूकदार तयार असल्याचा दावा केला आहे. सागर यांनी प्रस्तावित केलेली किंमत इतर विद्यमान बोलीधारकांवर विपरीत परिणाम करणारी असल्याचे सहाराने म्हटले आहे.
सागर यांच्या तीन असोसिएट्सचे ब्रिटनसह संयुक्त अरब अमिरातमध्ये आदरातिथ्य मालमत्ता तसेच वाणिज्यिक कार्यालये आहेत. सहाराच्या मालमत्तांसाठी प्रस्ताव सादर करताना तो ब्रिटनच्या इतिहासातील सर्वोत्तम असल्याचा दावा सागर यांनी केला आहे. सहाराच्या मालमत्ता म्हणजे आपण एक दीर्घकालीन गुंतवणूक मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सागर यांनी सादर केलेला प्रस्ताव हा निराधार असल्याचे नमूद करीत सहाराने प्रस्तावित करण्यात आलेली किंमत ही बाजारपेठेतील मालमत्तांच्या किमतीपेक्षा खूपच कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे उलट अधिक रकमेच्या निविदा भरणाऱ्यांचे मानसिकरीत्या खच्चीकरण होत असल्याचा दावा सहाराने केला आहे.
आपल्या विदेशातील मालमत्तांसाठी सहाराने यापूर्वी अमेरिकेतील मिराच कॅपिटलबरोबर चर्चा केली होती. मात्र ती निष्फळ ठरली. सहाराने २०१० मध्ये ग्रोसव्हेनर हाऊस खरेदी केले होते. त्यानंतर अमेरिकेतील दोन मालमत्ता २०१२ पर्यंत ताब्यात घेण्यात आल्या. या तिन्हीचे एकत्रित मूल्य १.५५ अब्ज डॉलर असल्याचे सांगण्यात येते.

म्युच्युअल फंडांची ‘इक्विटी’ गुंतवणूक खाती वाढली!
पीटीआय, नवी दिल्ली
समभागांशी निगडित असलेल्या विविध म्युच्युअल फंडांच्या खात्यांमध्ये जूनअखेर संपलेल्या तिमाहीत वाढ नोंदली गेली आहे. एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ही फंड खाती ६.१५ लाखांनी वाढली आहे.
भांडवली बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता रस यामुळे समभागनिगडित म्युच्युअल फंड खाती यंदा लक्षणीय वाढली आहेत. २०१५-१६ मध्ये फंड खात्यांमध्ये ४३ लाखांची भर पडली होती. तर आधीच्या, २०१४-१५ मध्ये ही संख्या केवळ २५ लाखांनी वाढली होती.
जून २०१६ अखेर समभागनिगडित म्युच्युअल फंड खात्यांची संख्या ३,६६,४०,३९६ वर पोहोचली आहे. मार्च २०१६ अखेरच्या ३,६०,२५,०६२ खात्यांच्या तुलनेत यात ६.१५ लाखांची भर गेल्या तिमाहीत पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 7:41 am

Web Title: not selling overseas properties sahara to supreme court
Next Stories
1 बांधकाम व्यवसायातील मंदीचा फटका; लोखंडी सळयांच्या भावात विक्रमी घसरण!
2 जपानकडून जागतिक बाजाराला २६५ अब्ज डॉलरचे उत्तेजन..
3 निवासी स्थावर मालमत्तांवरील ताण अद्याप कायम; सीआयआयचा अहवाल