वाढत्या करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर व्यापारी बँकांनी कर्ज वितरण सुरळित राखण्याला प्राधान्य देण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. सध्याच्या एकूणच परिस्थिती   पाहता, अर्थव्यवस्थेला पुनरूज्जिवित करण्याकरिता कर्ज पुरवठा करणे गरजेचे असल्याचेही बँकांना सांगण्यात आले आहे.

देशातील राष्ट्रीयीकृत तसेच निवडक खासगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणाचा हवाला देत आर्थिक स्थैर्यतेसाठी साहाय्य करण्याच्या सूचना बँकप्रमुखांना करण्यात आल्या. ग्राहकांना विनाअडथळा सेवा मिळावी याकरिता रक्कम देय तसेच तंत्र यंत्रणेवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकताही दास यांनी यावेळी मांडली.