देशातील आणखी एक वायदा बाजार व्यवसाय करण्यास अपात्र असल्याचा ठपका वायदा बाजार आयोगाने ठेवला आहे. याबाबत केलेल्या परीक्षणानंतर आढळून आलेल्या त्रुटीअंतर्गत युनिव्हर्सल कमॉडिटी एक्स्चेंजचे (यूसीएक्स) प्रवर्तक तसेच व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
वायदा बाजार चालविण्यासाठी ‘यूसीएक्स’ योग्य आहे, असे कोणत्या आधारावर म्हणता येईल, असे बजावत आयोगाने बाजाराची नोंदणी रद्द का करू नये, अशी नोटीस पाठविली आहे. याबाबत आपले म्हणणे सादर करण्यासही बाजाराला सांगितले गेले आहे. ‘यूसीएक्स’चे प्रवर्तक केतन शेठ व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण पिल्लई यांच्या नावे ही नोटीस गेली आहे. येत्या पंधरवडय़ात त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
या बाबत केपीएमजीने बाजाराचे गेल्या वर्षी लेखा परीक्षण केले होते. त्यात अनेक अनियमितता आढळल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
शेठ हे कॉमेक्स टेक्नॉलॉजीजचेही मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांचा बाजारमंचात ४० टक्के हिस्सा आहे.
‘यूसीएक्स’ने भारतातील आपल्या बाजार मंच व्यवहाराला एप्रिल २०१३ मध्ये प्रारंभ केला होता. मंचावरील वस्तूंच्या व्यवहार संख्येत उतार आल्यानंतर तसेच नियामकाद्वारे चौकशी सुरू झाल्यानंतर जुलै २०१४ मध्ये बाजारातील सर्व व्यवहार थांबविण्यात आले होते.