आता रेल्वे प्रवासासाठीच्या तिकिटांची ऑनलाइन खरेदी कोणत्याही उलाढाल शुल्काविना रुपे प्री-पेड कार्डामार्फत करणे शक्य होणार आहे. या कार्डाद्वारे नजीकच्या दिवसांमध्ये तुम्ही खरेदी तसेच विविध सेवांची देयकेही भरू शकता.
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन)ने सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय) व नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या सहकार्यातून हे कार्ड सादर केले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्डचे अनावरण मंगळवारी नवी दिल्लीत करण्यात आले. एनपीसीआयमार्फत वितरित करण्यात येणारे प्री-पेड कार्ड हे व्हिसा तसेच मास्टर कार्ड या आंतरराष्ट्रीय कार्ड तयार करणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच भारतातील व्यवहारासाठी आहे.
रेल्वे प्रवासाच्या तिकिटाच्या नोंदणीसाठी हे कार्ड सुरुवातीला उपयोगी होईल. नंतर त्यावरूनच खरेदी आणि देयक भरण्याची सुविधा उपलब्ध होईल.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा अथवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून हे कार्ड प्राप्त करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्डवर एक लाख रुपयांचे अपघाती विमा छत्र असल्याचे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण तिवारी यांनी सांगितले. प्रथम ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) दिल्यानंतर हे कार्ड १०,००० रुपयांचा भरणा केल्यानंतर तुम्ही वापरू शकता. तसेच परिपूर्ण केवायसी दिल्यानंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे कार्डही प्राप्त करता येते.
रेल्वेसाठीच्या रुपे कार्डद्वारे आयआरसीटीसीच्या व्यासपीठावर महिन्याला पाच व्यवहार मोफत होतील. मात्र याव्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये शुल्क लागेल.