केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारद्वारे योग दिनाच्या अनिवार्यतेची चर्चा विरली असतानाच आता आयुर्वेद दिनही साजरा होण्याची शक्यता खुद्द केंद्रातील आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.

धन्वंतरी जयंतीनिमित्ताने साण्डू फार्मास्युटिकल्सने मुंबईत आयोजित वैद्य सत्कार समारंभात त्यांनी याबाबतची घोषणा केली. नाईक यांच्या हस्ते या वेळी सहा ज्येष्ठ वैद्यांचा सत्कार करण्यात आला.
नाईक या वेळी म्हणाले की, आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा आहे आणि वैद्यांनी ती आजही जोपासली आहे. ही परंपरा, शास्त्र जगासमोर येण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेद दिन साजरा करण्यात येईल. याबाबतती अंतिम घोषणा लवकरच केली जाईल, असेही ते म्हणाले.
नाईक यांच्या हस्ते धनत्रयोदशीदिनी किरण पंडित, ऊर्मिला पिटकर, विनायक डोंगरे, दीपनारायण शुक्ला, मंगेश पाटील व संजय सातपुते या सहा वैद्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास या वेळी साण्डू फार्मास्युटिकल्सचे संचालक शशांक साण्डू, नागेश साण्डू, प्रभाकर साण्डू, घनश्याम साण्डू आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक यांच्या स्वदेशीच्या प्रेरणेने १० मे १८९९ मध्ये स्थापन साण्डू आयुर्वेदिक औषधाचा ठाकूरद्वार येथील प्रकल्प वाढत्या उत्पादन मागणीकरिता निर्मिती क्षमतेच्या हेतूने चेंबूर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचा इतिहासही या वेळी कथन करण्यात आला.