डोळ्यांना दिसणाऱ्या मात्र वाचता न येणाऱ्या छापील मजकुराच्या अवती-भवती ग्राहकाची स्वाक्षरी घेऊन आपला ‘अर्थ’ साधणाऱ्या विमा कंपन्यांवर  विमा प्राधिकरणाने आता बांध लादला आहे. विमा योजनेशी संबंधित कोणत्याही अर्जामधील मजकूर ‘टाइम्स न्यू रोमन’ फॉण्टमध्येच आणि तोही ७ आकारातच असावा, असा दंडक नियामक प्राधिकरणाने घातला आहे.
देशातील विमा व्यवसायाचे नियमन करणाऱ्या ‘इर्डा’ने मंगळवारी याबाबत थेट आदेशच काढला. धारकांना वाचण्यास अडचणीचे ठरणार नाही, अशाच पद्धतीने छापील मजकूर असावा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
विमाधारकांना वाचता येईल अशाच आकारात व पद्धतीने विमा योजनेच्या अर्जामध्ये मजकूर असावा, यावर भर देण्यात आला आहे. यानुसार ७ आकारात व ‘टाइम्स न्यू रोमन’ फॉण्टमध्येच अर्जातील छापील मजकूर असावा, असे विमा कंपन्यांना बजावण्यात आले आहे.