शेअर बाजारासाठी आजचा वार ‘मंगल’वार ठरला. सध्याचा बाजाराचा चढता क्रम पाहता निफ्टी १०००० चा पल्ला कधी गाठणार? याबाबत बाजार आणि विश्लेषकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर आज ऐतिहासिक भरारी घेत निफ्टीनं १००००चा पल्ला पार केला. व्यवहार सुरू होताच जवळपास ३४ अंशांनी वाढ नोंदवून निफ्टी १०,००१ वर पोहोचला. सेन्सेक्सही १०६ अंकांच्या वाढीसह ३२,३५२ अंकावर खुला झाला. ९ हजार ते १० हजार अंकांचा हा ऐतिहासिक पल्ला गाठण्यासाठी निफ्टीला जवळपास ९२ सत्रांची वाट पाहावी लागली, हे विशेष!

निफ्टीच्या ऐतिहासिक कामगिरीमागे रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, अदानी पोर्ट्स, इंडियाबुल मार्केट, एचडीएफसी बँक आदी कंपन्यांचा मोठा वाटा असल्याचं विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. या कंपन्यांचे समभाग चांगल्या वाढीसह व्यवहार करत आहेत. निफ्टी १० हजार अंकांचा जादुई आकडा पार करण्याची शक्यता सोमवारी बाजारात असलेल्या तेजीवरूनच वर्तवण्यात आली होती. या आठवड्यात निफ्टी हा पल्ला गाठू शकतो, असे सांगण्यात येत होतं. त्याबाबत बाजारात कमालीची उत्सुकताही होती. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे या आठवड्यातच हा पल्ला पार करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आज सुरुवातीलाच ३४ अंकांची वाढ नोंदवून निफ्टी १०,००१ अंकांवर खुला झाला. या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार शेअर बाजारासाठी विक्रमी ठरला. सेन्सेक्स ०.७ आणि निफ्टीने ०.५ टक्क्यांची वाढ नोंदवून विक्रमी स्तरावर बंद झाला होता. दरम्यान, बाजार मूल्यांकनात वाढ झाली असली तरी आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून दरकपात होण्याची शक्यता आणि अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’कडून हळूहळू दर वाढवण्याबाबत मिळालेल्या संकेतांमुळे बाजाराचा पाया अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निफ्टी १० हजार अंकाचा पल्ला गाठेल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली होती. पण निफ्टी इतक्या लवकर ऐतिहासिक भरारी घेईल असा विचार कुणीही केला नव्हता, असे विश्लेषकांनी सांगितले.