मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई स्टार एमएफ’ या म्युच्युअल फंड व्यवहारासाठीच्या मंचावर डिसेंबर २०१९ मध्ये ४९.६० लाख व्यवहार झाल्याचे ‘बीएसई’च्या ट्विटर खात्यावर जाहीर करण्यात आले. या आधी, ऑक्टोबरमध्ये ‘बीएसई स्टार एमएफ’वरील ४६ लाख व्यवहारांचा उच्चांक डिसेंबरमधील आकडेवारीने मोडला आहे.

‘बीएसई स्टार एमएफ’ हा भारतातील म्युच्युअल फंड व्यवहाराचा सर्वात मोठा मंच असून म्युच्युअल फंड ऑनलाइन व्यवहारापैकी २० टक्के व्यवहार या मंचावर होतात. म्युच्युअल फंड वितरकांना हा मंच ४ डिसेंबर २००९ रोजी उपलब्ध झाला. मंचावरील व्यवहाराच्या संख्येत दरवर्षी १०० टक्के वाढ होते.

‘बीएसई स्टार एमएफ’ने प्रथम फंड वितरकांसाठी ‘अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप’ नंतर आयफोन वापरकर्त्यांसाठीचे अ‍ॅप, युपीआयने पैसे गुंतविण्याची सुविधा, इंटरनेट बँकिंग द्वारा एसआयपीची नोंदणी इत्यादी सेवा वितरक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून दिल्या.