आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज्चे जिग्नेश शहाला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवार रात्रीपासून ताब्यात असलेला शहा तपासात सहकार्य करीत नसल्याचा आक्षेप सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी न्यायालयाकडे नोंदविला आहे.
‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड’च्या (एनएसईएल) ५,६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात कंपनीचा प्रमुख प्रवर्तक व फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज्चे (एफटीआयएल) संस्थापक जिग्नेश शहा याला सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी रात्री अटक केली होती. गेल्या वर्षी तयार करण्यात आलेल्या आरोपपत्रात शहा याचे नाव आहे.
शहाचे वकील अबाद पोंडा यांनी, शहाला यापूर्वीही अटक करण्यात आली होती व नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता; तेव्हा या प्रकरणात शहा याची चौकशी पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगितले. तर तपास यंत्रणेचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, आधीच्या चौकशीत शहा याचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना अधिक चौकशीकरिता कोठडी मिळण्याची आवश्यकता आहे.
जुलै २०१३ मध्ये हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली. ‘एनएसईएल’ १३,००० गुंतवणूकदारांचे वायदा वस्तूंचे करार पूर्ण करू न शकल्याने ५,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे या वेळी स्पष्ट झाले होते. या प्रकरणात संबंधितांच्या ८०० कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. शहा यांना ऑगस्ट २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली होती. १०० दिवसांच्या कोठडीनंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.