५,६०० कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्यातील बाजारमंचाच्या प्रमुखांना जामीन दिल्याचा राग गुंतवणूकदारांनी फेसबुक या समाजमाध्यमावर संबंधित न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर काळे फासून व्यक्त केला आहे. एका वकिलाने निदर्शनास आणलेल्या या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायबर गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली.
५,६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिडेट’चे (एनएसईएल) मुख्य प्रवर्तक जिग्नेश शहा हे सहा महिने गजाआड होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांनी गेल्या महिन्यात त्यांना जामीन मंजूर केला. एनएसईएलच्या गुंतवणूकदारांचा मंच असलेल्या ‘एनआयएफ एनएसईएल इन्व्हेस्टर फोरम’चे फेसबुकवर खाते आहे. या खात्यावर न्या. ठिपसे यांचे छायाचित्र टाकून त्यावर काळे करण्यात आल्याचे ज्येष्ठ वकिल नवीन छोमल यांना गेल्या आठवडय़ात निदर्शनास आले.
छायाचित्राखाली ‘अभय ठिपसे हाय हाय’ अशा ‘पोस्ट’ही होत्या. छोमल यांनी अखेर या प्रकरणात वांद्रे कुर्ला संकुल सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली. फेसबुकच्या या खात्यावर गुंतवणूकदार मंचाचे बोधचिन्हही आहे.