एनएसईएलच्या थकबाकीदारांकडून सुरू असलेल्या वसुलीच्या मंदावलेल्या गतीमुळे चिंतित झालेल्या ‘फॉरवर्ड मार्केट कमिशन’ने आपला वसुली अधिकाऱ्यांचा चमू अधिक सक्षम करण्याचे आदेश स्पॉट एक्सचेंजला दिले आहेत. तसेच थकबाकीदार सभासदांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासही बजावले आहे.

जिग्नेश शाह यांच्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीज् इंडिया लिमिटेडचाच घटक असलेल्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडची एकूण थकबाकी ५६८९ कोटींवर गेली आहे. त्यापैकी थकबाकीदारांकडून आतापर्यंत केवळ ३५९.३९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एकूण २४ थकबाकीदारांपैकी केवळ दोघा जणांनीच थकबाकीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केला आहे. मात्र तब्बल २२ जण अजूनही थकबाकीदार आहेत.
या पार्श्वभूमीवर, एनएसईएलचे व्यवस्थापकीय पदाधिकारी आणि त्यांच्यावरील देखरेख व लिलाव समिती यांच्यात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत वसुलीच्या मंदगतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एनएसईएलने आपला वसुलीचा वेग वाढवावा आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट निर्देश या वेळी देण्यात आले.
सर्व थकबाकीदारांविरुद्ध वसुलीसाठी कडक पावले उचलली जातील. त्यासाठी वसुली अधिकाऱ्यांचा चमू अधिक सक्षम करण्यात येईल, आवश्यकतेनुसार संबंधित थकबाकीदारांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल तसेच गरजेनुसार प्राथमिक माहिती अहवालही दाखल करण्यात येतील, असे आश्वासन एनएसईएल अधिकाऱ्यांनी दिल्याचे फॉरवर्ड मार्केट कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
निगोशिएबल इन्स्ट्रमेंटस् अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत थकबाकीदारंविरुद्ध कारवाई करण्याचा पर्यायही वापरला जाईल असेही या वेळी एनएसईएलतर्फे सांगण्यात आले. गतवर्षी जुलैपासून व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर एनएसईएल थकबाकी वसुलीसाठी झडगते आहे. तसेच एनएसईएलने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व वसुलीसाठी राज्य सरकारांनी सहकार्य करावे, अशी मागणीही केली आहे.
एनएसईएलची मुख्य प्रवर्तक फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज्चे सर्वेसर्वा जिग्नेश शहा यामुळे आणखी अडचणीत आले आहेत.