भांडवली बाजारात समूहासह उपकंपनीच्या घसरणीला कारणीभूत ठरणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिटेडशी (एनएसईएल) संबंधित विविध ब्रोकरची माहिती बाजार नियामक सेबीने मागविली आहे. याबाबत लक्ष दिले जात असून चौकशी करण्याची तयारी सेबीने गुरुवारीच स्पष्ट केले होते.
एनएसईएलशी थेट संबंध येणाऱ्या तसेच अप्रत्यक्ष अशा अनेक ब्रोकर, ब्रोकरेज संस्था यांची माहिती घेण्यात असून त्यांच्याकडून सविस्तर माहिती मागविली जात असल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रकारामुळे भांडवली तसेच अन्य बाजारांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एनएसईएलशी संबंधित ब्रोकरेजचे भांडवली बाजार, चलन बाजार तसेच अन्य व्यासपीठावरील नियमित व्यवहारात अडथळा न येण्याची पावले यामार्फत सेबीद्वारे उचलली जात आहेत. संबंधित कंपनी आणि व्यवहारातील ब्रोकर हे अन्य व्यवहारांतही कार्यरत असतात. यामध्ये समभाग, चलन आदींचा समावेश आहे.
एनएसईएलची मुख्य प्रवर्तक फायनान्शियल टेक्नॉलॉजीज (एफटीआयएल) तसेच समूहातील अन्य कंपनी एमसीएक्सच्या समभागांचे मूल्य शुक्रवारीदेखील ढासळले. कालच्या व्यवहारात ६५ टक्क्यांपर्यंत घसरताना एफटीआयएलच्या समभागाने बीएसई २०० मधील सत्यम कॉम्प्युटरनंतरची (७७%) सर्वात मोठी समभाग मूल्य घसरण नोंदविली होती. सलग दोन दिवसांच्या आपटीने एफटीआयएलचे बाजारमूल्य १,७९९ रुपयांवरून ६९६ कोटी रुपयांवर, तर एमसीएक्सचे बाजारमूल्य २,०८९ कोटी रुपयांवरून १,१७४ कोटी रुपयांवर आले आहे.

शुक्रवारी झालेली घसरण       
एफटीआयएल    ” १५१.२५     -४०.५०      २१.१२%
एमसीएक्स    ” ४०९.६५     -१०२.६५    २०.००%