अर्सेलरमित्तल, न्यूमेटलच्या बोलीला बँकांचा विरोध 

अर्सेलरमित्तलसह दोघांच्या एस्सार स्टीलच्या लिलावाकरिता भरलेल्या निविदेला स्टेट बँकेसह अन्य कर्ज देणाऱ्या वित्तीय कंपन्यांनी हरकत घेत त्या फेटाळल्या आहेत. त्यामुळे एस्सार स्टील खरेदीची ही प्रक्रिया आता नव्याने पार पाडावी लागणार आहे.

एस्सार स्टीलच्या कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला. नादारी आणि दिवाळखोर संहितेंतर्गत हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संहितेच्या कलम २९ अ अन्वये निविदा दाखल करणाऱ्या कंपन्यांचे प्रवर्तक या निविदा प्रक्रियेकरिता पात्र ठरत नसल्याचे कारण याकरिता देण्यात आले आहे.

एस्सार स्टीलकरिता अर्सेलरमित्तलने उत्तम गालवाच्या सहकार्याने निविदा दाखल केली आहे. मात्र उत्तम गालवाविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात प्रकरण दाखल आहे. तर अर्सेलरमित्तल व्यतिरिक्त निविदा दाखल करणाऱ्या न्यूमेटलच्या संचालक मंडळावर एस्सार स्टीलचे मुख्य प्रवर्तक रवी रुईया यांचे पुत्र रेवंत रुईया आहेत.

नव्याने लागू झालेल्या नादारी आणि दिवाळखोरी संहितेंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदे लवादांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचा लिलाव प्रक्रियेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित कर्ज देणाऱ्या बँकांना मिळाले आहेत. एस्सार स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने आता नव्याने निविदा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले आहे. या समितीचे नेतृत्व स्टेट बँक करत आहे. यानुसार निविदेकरिता दुसरा टप्प्यातील अंतिम मुदत २ एप्रिल आहे. स्टेट बँकेसह विविध ३० बँकांचे सुमारे ४५,००० कोटी रुपयांचे कर्ज एस्सार स्टीलने थकविले आहे.

निर्णयाविरुद्ध न्यूमेटलची लवादाकडे धाव

एस्सार स्टील खरेदीकरिता निविदा रद्द करण्याच्या बँकांच्या समितीविरोधात न्यूमेटलने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात लगेचच धाव घेतली आहे. निविदा प्रक्रियेकरिता आपल्याला अपात्र ठरविण्याच्या बँक समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी रशियाच्या न्यूमेटल कंपनीने लवादाच्या अहमदाबाद खंडपीठाला केली आहे. बँक समितीचा निर्णय लवादाला रद्द करण्याचा अधिकार असल्याचा दावा यानिमित्ताने या कंपनीने केला आहे.