सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात देशाच्या निर्मिती क्षेत्राने टाळेबंदीमुळे राहून गेलेला सारा अनुशेष भरून काढणारा दमदार वेग घेतला असून, औद्योगिक उत्पादन १३ वर्षांच्या उच्चांकाला गाठणारे तरे विक्रीनेही जवळपास १२ वर्षांतील सर्वाधिक मासिक वाढ दर्शविली आहे.

देशातील निर्मिती क्षेत्रात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. निर्मिती खरेदी व्यवस्थापक (पीएमआय) निर्देशांक ऑक्टोबरमध्ये समाधानकारक अशा ५० अंशाच्या खूप पुढे म्हणजे ५८.९ पर्यंत झेपावला आहे. कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमध्ये आलेल्या शिथिलतेने बाजारपेठेतील परिस्थिती सुधारण्यासह, मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मुख्यत: ऑक्टोबरमध्ये नवीन कामांना चालना मिळाली आहे.

देशातील खासगी निर्मिती क्षेत्रातील हालचाली टिपणारा आयएचएस मार्किट इंडिया निर्देशांक गेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा विस्तारला आहे. यापूर्वी हा निर्देशांक ऑक्टोबर २००७ मध्ये ५८ अंशांपर्यंत उंचावला होता. तर आधीच्या, सप्टेंबर २०२० मध्ये तो ५६.८ अंश नोंदला गेला होता. या निर्देशांकाची ५० अंश हा मध्यबिंदू असून, ५० च्या पुढे समाधानकारक प्रगतीची पातळी तर ५०च्या खाली तो नोंदला जाणे हा अधोगतीचा संकेत मानला जातो.

सलग ३२ महिने वाढ नोंदविल्यानंतर निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच म्हणजे एप्रिल महिन्यात उणे स्थितीत राहिला होता. यंदा प्रामुख्याने आरोग्यनिगा क्षेत्रातील उत्पादित वस्तूंना अधिक मागणी राहिली.

ऑक्टोबर २०२० मध्ये निर्यात उत्पादनासाठी नोंद ही जवळपास सहा वर्षांच्या उच्चांकी स्तरावर, तर विक्रीतील वाढीने २००८ च्या मध्यानंतरचा सर्वाधिक पातळी दाखविली आहे. मागणीतील या लक्षणीय वाढीमुळे कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन क्षमता वाढविल्या असून, त्याचा वेग ऑक्टोबर २००७ ची बरोबरी साधणारा दमदार ठरला आहे.

बाजारपेठेत विक्रीने दाखविलेली उभारी ही येत्या काही महिन्यांत कायम राहिल अशी कंपन्यांना आता खात्री वाटू लागली आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेलाही त्यांनी वेग देण्यास सुरुवात केली आहे.

– पॉलियाना डी लिमा, मुख्य अर्थतज्ज्ञ आयएचएस मार्किट