दिल्ली सरकारने सम-विषम वाहनांची योजना राबवली असून ती काही अंशी यशस्वी झाली असली तरी प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक पायाभूत सुविधांची जोड त्याला आवश्यक होती. अशा सुविधा वाढवणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे.
टाटा यांनी या योजनेच्या फायद्या-तोटय़ांवर विवेचन करण्यास नकार दिला. १५ जानेवारीपर्यंत ही योजन लागू राहणार आहे. या योजनेवर टिप्पणी करण्यास मी त्या विषयातील पात्र व्यक्ती नाही असे टाटा म्हणाले.
सम-विषम वाहनांची योजना इतर देशातही वापरली गेली आहे, त्याचा काही प्रमाणात उपयोगही झाला. त्यामुळे ही योजना आपण चटकन काही उपयोगाची नाही असे म्हणणार नाही, पण त्यात पाठबळासाठी पुरेशा पायाभूत सुविधा असायला पाहिजेत एवढेच सांगावेसे वाटते. त्यामुळे लोकांचा प्रवास सुखकर होईल.
दिल्ली सरकारने सम-विषम वाहनांची योजना १ जानेवारीला सुरू केली असून त्यात चार चाकी वाहनांना सम – विषम क्रमांकानुसार एकदिवसाआड रस्त्यावर येण्याची परवानगी दिली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या काळात ती राबवली जात आहे. ही योजना १५ जानेवारीच्या पुढे राबवणार नाही, असे दिल्ली सरकारने सांगितले आहे.
गेल्या आठवडय़ात दिल्ली उच्च न्यायालयाने ही योजना आठ दिवसच ठेवायला हवी होती कारण लोकांची गरसोय होत आहे, असे मत व्यक्त केले होते.