नवतरुणांच्या मानसिकतेवर बोट ठेवत अर्थमंत्र्यांकडून मंदीबाबत सारवासारव

चेन्नई : देशाच्या वाहन क्षेत्रातील मंदीला नवतरुण पिढीतील प्रवाशांची बदलती मानसिकता कारणीभूत असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी येथे केले. प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या १०० दिवसांच्या कामगिरीचा आढावा सीतारामन यांनी मंगळवारी चेन्नई येथे एका पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी बोलताना वाहन विक्रीतील सध्याच्या मंदीची कारणमीमांसा करताना, उपरोक्त कारण देत सारवासारव केल्याचे आढळून आले.

वाहन विक्रीतील घसरण ही ज्याप्रमाणे एप्रिल २०२० पासून लागू होत असलेल्या वाहनांसाठी ‘बीएस – ६’ दंडकाच्या अनिवार्यतेमुळे आहे त्याचप्रमाणे नवतरुण (मिलेनियल्स) प्रवाशांचा ओला, उबरसारख्या तंत्रस्नेही मंचावर वाहतूक सेवा देणाऱ्या माध्यमांकडील वाढत्या कलातून घडून आलेला हा परिणाम आहे, असे सीतारामन म्हणाल्या. सरकार गेल्या काही महिन्यांमध्ये धडाडीचे निर्णय घेतले असल्याचे आणि वाहतुकीच्या नियमांबाबत कठोर पावले टाकले असल्याचे  त्यांनी सांगितले.

वाहन निर्मात्या कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने सोमवारीच एकूण प्रवासी वाहन विक्री ४१.०९ टक्क्यांनी रोडावल्याचे जाहीर केले. तर सर्व गटातील मिळून वाहनांची विक्री २३.५५ टक्क्यांनी घसरली आहे. ऑगस्टमध्ये या क्षेत्राने विक्रीतील ऐतिहासिक घसरण नोंदविल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले.

सलग दहाव्या महिन्यात वाहन विक्रीचा घसरणप्रवास सुरू आहे. कमी मागणीअभावी अनेक कंपन्यांनी उत्पादन कपात केली आहे. वाहन उद्योगावरील वस्तू व सेवा कर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन वाहन निर्मात्या कंपन्यांना दिले आहे.