आंतरराष्ट्रीय बाजारात रोडावलेल्या कच्च्या तेलाच्या दराबाबत चिंता व्यक्त करणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक मंगळवारी त्याच्या गेल्या तीन महिन्यांच्या तळात विसावला. २१९.७८ अंशाच्या रूपात सलग पाचव्या व्यवहारात घसरताना मुंबई निर्देशांक २५,५०० स्तर सोडत २५,३१०.३३ वर स्थिरावला. तर ६३.७० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७०१.७० पर्यंत थांबला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दर हे जवळपास सात वर्षांच्या नीचांकावर येऊन ठेपले आहेत. तसेच भारतात वस्तू व सेवा करसारख्या आर्थिक सुधारणांचा मार्ग अद्यापही खडतर असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया अद्यापही कमकुवतच आहे. परिणामी, भांडवली बाजारात व्यवहार करताना त्यांनी येथील व्यवहार सलग पाचव्या सत्रात नकारात्मकतेचे नोंदविले.
२५,५०० चा स्तर सोडणाऱ्या सेन्सेक्सचा मंगळवारचा प्रवास २५,५४२.४७ ते २५,२५६.७९ असा राहिला. बंदअखेरचा सेन्सेक्सचा किमान स्तर हा त्याच्या ७ सप्टेंबरच्या टप्प्यासमकक्ष राहिला. तर व्यवहारात ७,७०० चा स्तर सोडणारा निफ्टी सत्रअखेर याच टप्प्याच्या सीमेवर राहिला.

रुपयाचा पाय अधिक खोलात
मुंबई : परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी आणखी खोलात गेला. एकाच व्यवहारात ११ पैशांनी घसरत रुपया सत्रअखेर ६६.८४ वर स्थिरावला. चलनाचा हा गेल्या दोन वर्षांतील नवा तळ होता. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत येत्या आठवडय़ात दशकात अपेक्षित पहिल्या व्याजदर वाढीने चलनातील अस्वस्थता नोंदली जात आहे. गेल्या शुक्रवारीच रुपयाने व्यवहारात ६७चा स्तर अनुभवला होता. मंगळवारच्या व्यवहाराचीही ६६.८५ अशी नरम सुरुवात केल्यानंतर रुपया सत्रात ६६.७१ या मजबूत स्थानावर विराजमान झाला. मात्र व्यवहारअखेर तो सोमवारच्या ६६.७३ पेक्षा ०.१६ टक्क्यांनी नरमला. रुपयाचा यापूर्वीचा ६७.०७ हा नीचांक ४ सप्टेंबर २०१३ रोजी होता. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति पिंप ४० डॉलरखाली नोंदले जात असलेल्या खनिज तेल दराचाही परिणाम चलन व्यवहारावर झाला.

मौल्यवान धातूंची चमक आणखी धूसर
मुंबई : भांडवली बाजार, परकी चलन व्यासपीठाबरोबरच मुंबईच्या सराफा बाजारातही मंगळवारी लक्षणीय मौल्यवान धातू दर नरमाई अनुभवली गेली.
स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅमसाठी २०० रुपयांनी कमी होत २५,३५० रुपयांपर्यंत आले. तर शुद्ध सोन्याचा दरही याच प्रमाणात तोळ्यामागे कमी होत २५,५०० वर येऊन ठेपला. चांदीच्या किलोच्या दरात थेट ६६५ रुपयांची घसरण होऊन त्याचा दर ३५ हजारांखाली येताना ३४,७१५ रुपयांवर स्थिरावला.
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याचे दर किरकोळ प्रमाणात वाढत प्रति औन्स १,१०० डॉलरनजीक पोहोचले.