दोन लाख रुपयांवरील सोने खरेदीकरिता जानेवारीपासून पॅन बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला. या देशव्यापी एक दिवसाच्या बंद आंदोलनात जवळपास ५०० शहरांतील एक लाख व्यापारी सहभागी झाले.
बंद आंदोलनात मुंबईतील ३०० सराफ व्यापारी सहभागी झाले होते. बंदपायी केवळ मुंबईतून सुमारे १३०० कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाल्याचा अंदाज आहे. २०० हून अधिक संघटनांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या बंद निर्णयामुळे क्षेत्रातील एक कोटींहून अधिक कामगार-कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाल्याचे सांगण्यात आले; तर या व्यवसायात अप्रत्यक्ष सहभागी रोजगाराची संख्या ६ कोटी आहे.
एकूण लोकसंख्येपैकी देशातील विशेषत: निमशहरे, ग्रामीण भागात ८० टक्क्य़ांकडे पॅन नसल्याने त्याची १ जानेवारी २०१६ पासून सक्ती करण्यात आल्यामुळे गेल्या महिनाभरात ३० टक्क्य़ांहून अधिक व्यवसाय रोडावल्याचे आघाडीच्या सराफ संघटना ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ (जीजेएफ) ने म्हटले आहे. देशभरात आतापर्यंत २२.३ लाख पॅनच दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सरकारने डिसेंबर २०१५ मध्ये आदेश काढून दोन लाख रुपयांवरील सोने धातू अथवा सोन्याचे दागिने खरेदीकरिता सरकारने आता पॅन अनिवार्य केले. यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपयांपुढे होती. ही मर्यादा १० लाख रुपये करण्याबाबत संघटनेने यापूर्वीच अर्थ खात्याला सांगितले आहे.
मागणीअभावी कमी दर होऊनही सोने, चांदी धातू तसेच त्यांचे दागिने याला गेल्या काही महिन्यांपासून मागणी नसताना पॅन सक्तीने व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे ‘जीजेएफ’चे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर यांनी म्हटले; तर संघटनेचे संचालक अशोक मीनावाला यांनी काळा पैसा रोखण्यासाठी सरकारच्या याबाबतच्या उपाययोजना या लाखो व्यावसायिक, सुवर्णकार, कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर घाला आणणाऱ्या असल्याचे नमूद केले. पॅन सक्तीविरोधात सराफा व्यावसायिकांनी यापूर्वी मेणबत्ती मोर्चा काढून विरोध दर्शविला होता, तर बुधवारच्या आंदोलनात सराफा व्यावसायिकांनी आपल्या पेढय़ा, दालने बंद ठेवली. दागिने निर्मितीचे कार्यही यामुळे ठप्प पडले. बंदला महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाने पाठिंबा दिला; तर ‘इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन’ने (आयबीजेए) मात्र विरोध दर्शविला होता.