वार्षिक प्राप्तिकर विवरणपत्र संगणकाद्वारे ऑनलाइन दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणीकरण आता एटीएम यंत्रामधून सुलभरीत्या करदात्यांना मिळविता येईल. इंटरनेट बँकिंगची सुविधा न घेतलेल्या करदात्यांना त्यांच्या बँक-खात्याच्या आधारे प्रमाणीकरण हे एटीएमद्वारे करण्याची सुविधा चालू वर्षांत मे महिन्यापासून सुरू केली गेली आहे. सध्या स्टेट बँक आणि खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रांमधून उपलब्ध असलेल्या या सुविधेसाठी अन्य बँकांकडूनही पुढाकार घेतला जाणे अपेक्षित आहे.
करदात्यांसाठी ही सुविधा सुरू करण्याचा उद्देश संपूर्ण कर विवरण दाखल करण्याची प्रक्रिया कागदरहित करण्याचे आहे. त्यामुळे ऑनलाइन ई-विवरण पत्र दाखल केल्यावर, पुन्हा आयटीआर अर्ज व कागदपत्रे भौतिक स्वरूपात बंगळुरू येथील केंद्रीय प्रक्रिया केंद्राला (सीपीसी) पाठविण्याची गरज राहणार नाही, अशी ही सुविधा आहे. विवरण पत्र दाखल केल्याचे प्रमाण हे एटीएममार्फत मिळविता येऊ शकेल.
२०१५-१६ कर निर्धारण वर्षांसाठी कर-विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१६ निश्चित करण्यात आली आहे. व्यक्तिगत कर दात्यांनी आयटीआर-१ नमुन्यात आपले विवरण पत्र दाखल करावयाचे आहे.
प्राप्तिकर विभागाच्या http://incometaxindiaefiling.gov.in/ या संकेतस्थळावर ई-फायलिंग अर्थात ऑनलाइन विवरण पत्र दाखल करण्याची नवीन प्रकारची ही सुविधा उपलब्ध आहे. करदात्यांना आपला संपर्क तपशील, मोबाईल क्रमांकांची सर्वप्रथम नोंदणी करणे त्यासाठी आवश्यक ठरेल. त्यानंतर आधार क्रमांकांचा वापर करून ही कागदरहित विवरण पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडता येईल.