अॅसोचॅमच्या पाहणीचा निष्कर्ष
सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या ‘आयआयएम’सारख्या व्यवस्थापन शिक्षणाच्या संस्था आणि अन्य आघाडीच्या खासगी संस्थांतून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांचा अपवाद केल्यास, देशात कार्यरत अन्य ५,५०० तथाकथित बिझनेस स्कूल्समधून उत्तीर्ण होणारे बहुतांश ‘एमबीए’ पदवीधर हे नोकरीच्या बाजारात बिनलायकीचे ठरत असून, आजच्या घडीला त्यांना मासिक १० हजार रुपयांपेक्षा कमी वेतनाच्या कामांवर समाधान मानावे लागत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.
उद्योगजगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अॅसोचॅम’च्या शिक्षणविषयक समितीने केलेल्या या पाहणीचे निष्कर्ष मांडताना, व्यवस्थापन शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आयआयएम वगळता अन्य संस्थातील केवळ सात टक्के एमबीए उत्तीर्णच नोकरीक्षम असून, त्यांना अपेक्षित हुद्दा व वेतनमान मिळत असल्याचे ही पाहणी सांगते.
सध्या कार्यरत ५,५०० व्यवस्थापन संस्थांमध्ये मान्यता नसलेल्या संस्था जमेस धरल्यास एकूण आकडा प्रत्यक्षात खूप मोठा असेल. मुंबई, कोलकाता, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, अहमदाबाद, लखनऊ, हैदराबाद आणि देहरादून ही शहरांमध्ये या संस्थांचे केंद्रीकरण झाले आहे. गत वर्षी यापैकी २२० संस्थांना टाळे लागले, तर चालू २०१६ सालात आणखी १२० हून अधिक संस्था नामशेष होतील, असा या पाहणीचा कयास आहे.
शिक्षणाचा निष्कृष्ट दर्जा हे प्रमुख कारण आहेच. बरोबरीने मंदावलेले अर्थकारण हेही एमबीए पदवीधरांच्या मागणीत घटीचे कारण आहे. २०१४ सालापासून कॅम्पस रिक्रूटमेंट अर्थात शिक्षण संस्थांच्या आवारातूनच उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रमाणातील ४५ टक्के घसरण झाली असल्याचेही पाहणीतून पुढे आले आहे.
तथापि नोकरीत सामावले जाण्याचे प्रमाण घटत असतानाही, गत पाच वर्षांत व्यवस्थापन शिक्षणसंस्थांची प्रवेश क्षमता तिपटीने फुगली आहे, या विसंगतीकडेही अॅसोचॅमचे महाव्यवस्थापक डी. एस. रावत यांनी लक्ष वेधले. २०११-१२ मध्ये ३,६०,००० असलेली प्रवेशक्षमता २०१५-१६ मध्ये ५,२०,००० वर गेली.

काळानुरूप अद्ययावतता आणि निरंतर बदल असलेल्या जागतिक व्यावसायिक दृष्टिकोन असणारे नवनवीन अभ्यासक्रम आणि अनुरूप शिक्षकवृंद बाळगण्यात आणि कायम राखण्याचे मूलभूत अपयश जेथे आहे, अशा शिक्षण संस्थांचा एकूण पाठय़क्रम मग निर्थक आणि निरुद्योगीच उमेदवारच तयार करणार. भारतातील व्यवस्थापन शिक्षणप्रणालीच्या ऱ्हासाबाबत त्वरेने उपाय आवश्यकच आहेत.
’ डी. एस. रावत, महाव्यवस्थापक, अॅसोचॅम