News Flash

एकाच फंडाद्वारे जागतिक बाजारात गुंतवणुकीची संधी

गुंतवणूकदारांना या ग्लोबल अ‍ॅडव्हान्टेज फंडाने २२.८३ टक्के चक्रवाढ (सीजीएआर) दराने परतावा दिला आहे.

मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांना परदेशी बाजारातील अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, गूगल (अल्फाबेट) या समभागांचे आकर्षण असेल तरी त्यात थेट गुंतवणूक करणे त्यांना अवघड असते. अशा गुंतवणूकदारांनी जागतिक बाजारांमधील गुंतवणुकीच्या संधींसाठी म्युच्युअल फंडाचा मार्ग निवडता येणे मात्र शक्य आहे. शिवाय या एकाच फंडाद्वारे भारतात उभरत्या परंतु अद्याप सूचिबद्ध नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होईल.

आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या ‘ग्लोबल अ‍ॅडव्हान्टेज फंडा’च्या माध्यमातून अमेरिका, जपान, हाँगकाँगसारख्या विभिन्न भांडवली बाजारात गुंतवणूक करता येईल. हा फंड तेथील बाजारात आधीपासूनच उपस्थित फंडांमध्ये गुंतवणूक करतो. फंडाचा पोर्टफोलिओ पाहिल्यास याच्या एकूण गुंतवणुकीपैकी २६ टक्के गुंतवणूक ही अमेरिकी ब्लूचिप इक्विटी फंडात आहे. तर निप्पॉन इंडिया ईटीएफ हाँगकाँगमध्ये २५.४ टक्के, फ्रँकलिन एशियन इक्विटी फंडात २१.५ टक्के, निप्पॉन जपान इक्विटी फंडात २०.९ टक्के गुंतवणूक आहे.

गुंतवणूकदारांना या ग्लोबल अ‍ॅडव्हान्टेज फंडाने २२.८३ टक्के चक्रवाढ (सीजीएआर) दराने परतावा दिला आहे. म्हणजेच ऑक्टोबर २०१९ मध्ये फंडाची सुरुवात झाली तेव्हा १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर मे २०२१ मध्ये ती रक्कम १४,०३७ रुपये झाली असेल.

फंड ऑफ फंड्स धाटणीचा हा फंड निधी व्यवस्थापकाला सर्व भौगोलिक क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असते आणि ते विविध बाजारांविषयक बदलत्या दृष्टिकोनानुरूप पोर्टफोलियोत बदल करू शकतात. फंडाची ५१ टक्के गुंतवणूक ही उदयोन्मुख बाजारपेठेत तर ४९ टक्के गुंतवणूक विकसित बाजारपेठेमध्ये आहे. जेव्हा विकसित बाजारपेठेचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा हा फंड त्या बाजारात गुंतवणूक करतो. तर दुसरीकडे जेव्हा उदयोन्मुख बाजारपेठा चांगली कामगिरी करतात तेव्हा हा फंड तेथे गुंतवणूक करतो. यात आशियासह जपानच्या बाजारांचा समावेश आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना जगभरातील बाजारात गुंतवणूक करण्याचा हा एकछत्र उपाय आहे.

सध्या जागतिक बाजारपेठेत भारतीय गुंतवणूकदारांची रुची वाढली आहे. म्हणूनच देशातील म्युच्युअल फंड घराणी या बाजारांत आपल्या योजना प्रस्तुत करीत आहेत. जागतिक बाजारपेठेत अनेक आव्हानेही आहेत. म्हणूनच गुंतवणूकदारांनी या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जोखीम संतुलित होऊन लाभ प्राप्त होतो. परदेशी बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्या भारतात नसल्याने परदेशी बाजाराचे आकर्षण वाढले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ई-कॉमर्स, डिजिटल मंच, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर यासारख्या नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्या परदेशी बाजारात सूचिबद्ध असून गेल्या काही वर्षांत या बाजारांनी चांगला परतावादेखील दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:11 am

Web Title: opportunity to invest in the global market through a single fund akp 94
Next Stories
1 वेगवान ‘५जी’साठी सज्जता
2 ‘एम१एक्स्चेंज’कडून छोट्या उद्योगांना ७,०५५ कोटींचे साहाय्य
3 ‘मारुती’चा ग्रामीण भारतात वरचष्मा
Just Now!
X