नादारी व दिवाळखोर प्रक्रिया राबविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाकरिता जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांना दावे दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने याबाबत बँकांना ४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

जेट एअरवेजने या प्रक्रियेकरिता ग्रँट थॉर्टनचे आशिष चावचरिया यांची तिढा व्यावसायिक म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीत सध्या बँकांचा ५१ टक्के हिस्सा आहे.

कंपनीत सुरुवातीला सध्याची एक भागीदार कंपनी एतिहाद तसेच हिंदुजा समूहाने उत्सुकता दर्शविली होती.

जेटचे प्रवर्तक नरेश गोयल हे पायउतार झाल्यास आपण कंपनीतील हिस्सा वाढवू, असे एतिहादने म्हटले होते. १७ एप्रिलपासून व्यवसाय ठप्प असलेल्या जेट एअरवेजवर विविध २६ व्यापारी बँकांचे ८,५०० कोटी रुपयांचे कर्ज असून अन्य सेवा कंपन्यांची तसेच कर्मचाऱ्यांची देणी मिळून रक्कम १३,००० कोटी रुपयांवर आहे.

स्टेट बँकेने जेट एअरवेजविरुद्ध २० जून रोजी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणात याचिका दाखल केली.