मुंबई : पोलाद क्षेत्राकरिता रिफ्रॅक्टरी उत्पादनांमधील अग्रणी जागतिक पुरवठादार कंपनी आरएचआय मॅग्नेसिटा या कंपनीने ओरिएंट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड अंतर्गत आपल्या भारतीय कंपन्यांचे एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. या एकत्रीकरणामुळे भारतातील अपरिहार्य उत्पादने आणि सेवांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे.

नुकत्याच झालेल्या प्रातिनिधिक बैठकीत ओरिएंट रिफ्रॅक्टरीज, आरएचआय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आरएचआय क्लासिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या संचालक मंडळांनी ओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आपल्या कंपन्यांना विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे आता ओरिएंट ही कंपनी रिफ्रॅ क्टरीज उत्पादन आणि पुरवठय़ाच्या बाबतीत अग्रेसर कंपनी बनणार असून एकत्रिक कंपनीचा महसूल १,२३५ कोटी रुपये इतका होईल. तर तिच्या दोन उत्पादन केंद्रांत आता ७०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असतील.

विलीनीकरणाबाबत आवश्यक त्या मान्यता मिळविल्यानंतर, ओरिएंट रिफ्रॅक्टरीज या कंपनीचे नाव बदलून ‘आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड’ असे करण्यात येणार आहे. यामुळे एकसंध अशा मजबूत कंपनीमध्ये भारतातील तीन परिचालन कंपन्यांची ताकद व क्षमता सामावली जाणार आहे. परिणामी, भविष्यातील वृद्धीच्या संधी शोधून भागदारांचे मूल्य वाढवण्याची क्षमताही या कंपनीमध्ये अधिक असेले, असे कंपनीतर्फे अहवालातून सांगण्यात आले.