२८ डिसेंबर. २०१२ चा म्हटला तर तसा विशेषच. टाटा समूहासाठी ग्राह्य धरला तर अतिविशेष. मात्र ‘बॉम्बे हाऊस’साठी तो अगदी नित्याचा ठरला.
गेल्या पाच दशकांपासून समूहात महत्त्वाची व्यक्ती राहिलेले रतन टाटा यांनी आज त्यांचा ७५ वा वाढदिवस मुख्यालयापासून लांब साजरा केला. तर त्यांच्याकडून नवे वारसदार म्हणून ऐन सूत्रे स्वीकारण्याच्या मुहूर्ताला सायरस मिस्त्री मात्र नेहमीच्या वातावरणातच सकाळी दाखल झाले. रतन टाटा आज सकाळपासूनच पुण्यात होते. तर सायरस मिस्त्री सकाळी मुख्यालयात आले असले तरी खऱ्या अर्थी ते उद्याच, शनिवारी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. समूहातील टाटा मोटर्समार्फत तयार केले जाणाऱ्या टाटा मान्झामधून आकाशी रंगाच्या शर्टातील मिस्त्री सकाळी ‘बॉम्बे हाऊस’च्या गेटवर येताच छायाचित्रकारांचा यावेळी एकच गराडा पडला.
फोर्ट येथील ‘बॉम्बे हाऊस’मध्ये उभय उद्योगपती धडकणार असल्याच्या वृत्ताने सिटी बँकेच्या गल्लीत सकाळपासूनच दूरचित्रवाहिन्यांची वाहने उभी होती. तर सकाळच्या १० च्या सुमारास येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही तुरळक हालचालही पहायला मिळाली. मुख्यालयाचे स्वागत कक्ष तसेच परिसरात टाटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे तसेच मिस्त्री यांचे अभिनंदन करणारे अनेक पुष्पगुष्छ येथे हितचितकांच्या भेटकार्डाद्वारे दाखल झाले होते. तर प्रवेशद्वारावरील सुरक्षेची चाचपणीही वेगळी अशी नव्हतीच.
सायरस मिस्त्री हे रतन टाटा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याचा कोणताही औपचारिक सोहळा आज मुख्यालयात होणार नव्हता, असे टाटा सन्सच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारीच ‘लोकसत्ता’कडे स्पष्ट केले होते. असे असूनही ‘बॉम्बे हाऊस’ भोवतालचे वातावरण वेगळेच अनुभवत होते. सायरस मिस्त्रींचा अध्यक्ष म्हणून पहिला दिवस असो की आमचे सर्वेसर्वा रतनजी यांचे कार्यालयातील आगमन असो ‘बॉम्बे हाऊस’ची आणि आमची दैनंदिनी मात्र नियमित असते, असे समूहाच्या एका कर्मचाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.