महाराष्ट्रात सध्या सेवेत असलेल्या एकूण कामगार-कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४० टक्केच त्या नोकरीस लायक आहेत, असे एका पाहणी अहवालाचा निष्कर्ष आहे. २०१४ सालातील ४४ टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांत हे प्रमाण घटले असले तरी कर्मचाऱ्यांच्या नोकरीयोग्यतेबाबत देशातील अव्वल १० राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून तो १० व्या क्रमांकावर आहे.
भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआय, लिंक्डइन, पीपलस्ट्राँग एचआर सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज् या संस्थांच्या सहकार्याने व्हीबॉक्सने तयार केलेल्या ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१६’ नामक अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. व्हीबॉक्सने त्यासाठी देशभरात २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशातील तब्बल ५.२ लाख उमेदवारांची नोकरीयोग्यतेच्या विविध निकषांवर चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये कर्मचाऱ्यांची सांख्यिक व तार्किक क्षमता, संवाद व संभाषण क्षमता, आपल्या व्यवसाय व सेवाविषयक ज्ञान अजमावण्यात आले.
या पाहणीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण म्हणजे नोकरीयोग्यता मानली गेली. महाराष्ट्रात हे प्रमाण ४० टक्के आढळले, तर राष्ट्रीय सरासरी ३८ टक्के अशी आढळून आली. आधीच दोन वर्षांत राष्ट्रीय सरासरीचे प्रमाण अनुक्रमे ३७ टक्के व ३३ टक्के असे होते. महाराष्ट्रात नोकरीयोग्य ठरलेल्या कर्मचाऱ्यांनी अपेक्षिलेले वार्षिक सरासरी वेतनमान २.६० लाख रुपये असे आहे.

रोजगारात १४.५% वाढीचे भाकीत!
आगामी २०१६ सालात नोकरीसाठी बोलावणे येईल, अशी अधिकाधिक लोकांना अपेक्षा करता येईल. या पाहणीने हे प्रमाण १४.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. किराणा/विक्री क्षेत्र, ई-व्यापार, बँकिंग व वित्तीय सेवा, औषधनिर्मिती, दूरसंचार व निर्मिती क्षेत्र आदींमध्ये नवीन रोजगार २० टक्के दराने वाढण्याचे कयास आहेत. त्या खालोखाल बीपीओ, केपीओ अशा माहिती-तंत्रज्ञानाशी संलग्न सेवांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक लोकांना नोकरी मिळेल. नोकरी इच्छुकांना वाढीव संधी देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी असेल.