08 July 2020

News Flash

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगच्या  कारवाया नियमबाह्य़च – ‘सेबी’प्रमुख

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगच्या प्रकरणात नेमक्या अशाच परवानगी नसलेल्या प्रथांचा अनुनय झाला असल्याचे आढळून येते

 

गुंतवणूकदारांच्या रोख्यांचा दलाली पेढीकडून फायद्यासाठी वापर गैरच

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोक्रिंग या दलाली पेढीने अनेक नियमबाह्य़ आणि कोणत्याही तऱ्हेने परवानगी नसलेल्या कारवाया केल्या असल्याचे भांडवली बाजाराचे नियंत्रक ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी येथे प्रतिपादन केले आणि या दलाली पेढीवर केलेल्या कारवाईची समर्पकताही अधोरेखित केली.

जवळपास २,००० कोटी रुपयांच्या घोटाळा झाला असल्याच्या संशयावरून, ‘सेबी’ने गेल्या आठवडय़ात शुक्रवारी काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगवर नवीन गुंतवणूकदारांची नोंदणी करण्याला बंदी घालणारी कारवाई केली आहे. काव्‍‌र्हीकडे सध्या सुमारे अडीच लाख डीमॅट खातेधारक असून, त्यांचे नियमित गुंतवणूक व्यवहार याच दलाली पेढीमार्फत सुरू आहेत. खातेधारकांपैकी गहाण असलेल्या समभागांची विक्री करण्याला सेबीने काव्‍‌र्हीवर बंदी घातली आहे.

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगने त्यांच्यामार्फत व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यातील समभाग, स्व-नियंत्रणातील डीमॅट खात्यात हस्तांतरित करून, ती तारण ठेवून मोठय़ा प्रमाणात कर्जरूपात निधी उभारला आणि तो निधी बांधकाम क्षेत्रातील उपकंपनी काव्‍‌र्ही रिअ‍ॅल्टीकडे वळता केला. पुढे हे गहाणवट राखलेले समभाग संबंधित गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात पुन्हा हस्तांतरित करण्यात अपयश आल्याचे लक्षात आल्यावर हा सर्व घोटाळा प्रकाशात आला. अशा तऱ्हेने सुमारे २,००० कोटी रुपयांचा निधी काव्‍‌र्ही रिअ‍ॅल्टीच्या प्रकल्पांसाठी वापरात आल्याचा संशय आहे.

जूनमध्ये ‘सेबी’ने परिपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना, सर्व संबंधितांना आधीपासून सुरू असलेल्या गैरप्रथांना मुरड घालून त्यापासून फारकत घेण्याचे आदेश दिले होते. काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगच्या प्रकरणात नेमक्या अशाच परवानगी नसलेल्या प्रथांचा अनुनय झाला असल्याचे आढळून येते, असे सेबीप्रमुख अजय त्यागी यांनी उद्यम सुशासनावरील ओईसीडीच्या गोलमेज परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

गुंतवणूकदारांनी विश्वासाने ठेवलेल्या रोख्यांचा वापर हा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेण्याचा हा प्रकार, जूनमधील परिपत्रकाद्वारे दिलेले मुद्देसूद आदेश नसते तरीही गैरच ठरला असता, अशीही त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना पुस्ती जोडली. कोणत्याही दलाली पेढीने करू नये अशी ही अगदी मूलभूत स्वरूपाची गोष्ट आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने १ जानेवारीपासून केलेल्या तपासणीच्या आधारे १९ ऑगस्टला सादर केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ‘सेबी’ने काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगवर बंदी घालणारी कारवाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2019 3:06 am

Web Title: out of rule of coworking stock broking akp 94
Next Stories
1 सेन्सेक्स, निफ्टी उच्चांकी
2 मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, निफ्टी सर्वोच्च स्तरावर बंद
3 दुसऱ्या तिमाहीत अर्थवृद्धीदर  ५ टक्क्यांखाली जाणार – इंडिया रेटिंग्ज
Just Now!
X