देशातील तिसरी मोठी खासगी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने सिटिबँकेच्या सहयोगाने भारतात प्रथमच वेगवेगळ्या १५० देशांमधील इच्छित बँक खात्यांमध्ये विविध १०० हून अधिक चलनांमध्ये विनाविलंब पैसे पाठविण्याची सुविधा सुरू केली आहे. अशा प्रकारे ‘आऊटवर्ड रेमिटन्स’ची सुविधा सुरू करण्याचा पहिला बहुमान अ‍ॅक्सिस बँकेने मिळविला आहे. ऑनलाइन पद्धतीने होणारा व्यवहार अत्यंत पारदर्शी असेल आणि ग्राहकांना त्या त्या चलनाचा त्यावेळी उपलब्ध विनिमय दर पडताळून घेऊन हा रक्कम धाडण्याचा व्यवहार पार पाडता येईल, असा बँकेचा दावा आहे.
आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनीयरिंगला १९६ कोटींचे कंत्राट
मुंबई : आयएल अ‍ॅण्ड एफएस इंजिनीयरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनीने पश्चिम बंगाल राज्य विद्युत वितरण कंपनीकडून राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एकूण १९६ कोटी रुपये खर्चाचे कंत्राट मिळविले आहे. २४ परगणा जिल्ह्य़ासाठी मिळविलेले हे कंत्राट कंपनीने दोन वर्षांमध्ये पूर्ण करावयाचे आहे.