वैश्विक खाते क्रमांकामुळे नोकरी बदलली तरी भविष्यनिधीची रक्कम हस्तांतरित होणारी प्रणाली गुरुवारपासून सुरू होत असून पहिल्या टप्प्यात याचा लाभ एक कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष संकेतस्थळाचे सादरीकरण पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत होत आहे. कर्मचारी, सदस्यांना यामुळे आपल्या निर्वाह निधीची अद्ययावतत: स्वत: तपासता येईल. त्याचबरोबर संकेतस्थळाला पुरविलेल्या मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल पत्त्यावर दर महिन्याला खात्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
भविष्य निर्वाह निधीचे देशभरात ९ कोटींहून अधिक सदस्य असून पैकी ४ कोटी खाती ही कार्यरत आहेत. त्यातूनही पहिल्या टप्प्यात एक कोटी खात्यांना सामायिक पीएफ खाते क्रमांक असून येत्या तीन महिन्यांत उर्वरित कार्यरत सदस्य/ कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयातील अतिरिक्त संचालक अरुण सिन्हा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
संघटनेच्या विशेष संकेतस्थळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपला निधी एकाच क्रमांकाद्वारे हस्तांतरित करणारी ही यंत्रणा आहे. कामगार मंत्रालयाने तूर्त काही लाख कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांच्या बँक खात्यांच्या आधारावरच सेवा प्रदान केली जाणार आहे. तूर्त केवायसी अथवा आधार क्रमांक त्यासाठी सक्तीचा केला जाणार नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
आर्थिक सर्वसमावेशकतेची जनधन योजना, ग्रामीण विकासासाठी आदर्श गाव योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. नवीन कामगारविषयक योजना ही त्याचाच एक भाग आहे. याचअंतर्गत गुरुवारपासून कामगारांसाठी पूर्व शिक्षण तसेच तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर उपक्रमांचीही सुरुवात होत आहे. यानंतर अधिकाधिक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्याच राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेशीही जोडले जाणार आहे. देशभरात ४५ कोटींहून अधिक कामगार वर्ग असून पैकी १० टक्के हे संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत.