वित्तीय समावेशकतेचे प्रभावी माध्यम म्हणून देशात सुरू झालेल्या बचतगटांच्या पायावर आधारित सूक्ष्म-वित्त चळवळीभोवती अनेक कारणाने वादाचे मोहोळ उठले आहे. या पाश्र्वभूमीवर या चळवळीचे विश्वासार्ह पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्व सहभागींना प्रशिक्षित करून जनसामान्यांमध्ये पुन्हा विश्वास मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. सूक्ष्म-वित्त क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांमध्ये सध्या वापरात येणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींना ‘अ‍ॅक्सिऑन’ या जागतिक समूहाच्या विशेतज्ज्ञची जोड मिळून एका ‘सक्तीच्या गट प्रशिक्षण’ उपक्रमाची आखणी केली गेली आहे.
जागतिक बँकेचे एक अंग असलेल्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी)ने अ‍ॅक्सिऑनच्या या सक्तीच्या गट प्रशिक्षणाच्या (कम्पल्सरी ग्रुप ट्रेनिंग- सीजीटी) उपक्रमाला पाठबळ दिले आहेच. त्या बरोबरीनेच, स्वाधार, उज्जीवन, ग्रामीण कूटा, एसकेएस आणि इक्विटास या देशातील सुस्थापित सूक्ष्म-वित्त संस्थांच्या (मायक्रोफायनान्स इन्स्टिटय़ूशन्स) अनुभवसिद्ध चांगल्या कार्यपद्धती आणि पायंडय़ांचा या ‘सीजीटी’अंतर्गत समावेश केला गेला आहे. केंद्र सरकारकडून या संबंधाने आखल्या जात असलेला नवीन कायदा आणि नियमनाला पूरक स्वरूपाचा असा हा उपक्रम असून, तो स्वेच्छेने राबविण्यासाठी अनेक सूक्ष्म वित्त संस्थांनी पुढाकार घेतला असल्याचे ‘अ‍ॅक्सिऑन’कडून स्पष्ट करण्यात आले.
तळागाळाच्या पातळीवर बँकिंग परिघाबाहेरच्या या सूक्ष्म-वित्त संसाधनांतून अर्थसहाय्य मिळवून छोटा व्यवसाय सुरू करणाऱ्या सूक्ष्म-उद्योजकाचे हितरक्षण हा प्रधान उद्देश ठेवून हा उपक्रम सुरू झाला आहे. यातून सूक्ष्म-वित्त तसेच बचतगटांच्या क्षेत्रात कार्यरत मंडळींसाठी एका समग्र अशा प्रशिक्षण कार्यक्रमाला विकसित केले जाणे अपेक्षित आहे. हा कार्यक्रम किमान तीन दिवसांसाठी राबविला जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.