बँकेत खाते नसल्याने पैशाच्या देवाणघेवाणीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध नसणाऱ्या बँकिंग परिघाबाहेरच्या बहुसंख्य लोकसंख्येला वरदान ठरेल, अशी ‘ऑक्सिकॅश’ नावाची तात्काळ निधी हस्तांतरण सेवा दाखल झाली आहे. बँकेत साधे बचत खातेही नसणाऱ्या, परगावात मजुरी, रोजीरोटीसाठी स्थलांतरित झालेल्या मंडळींना आपल्या आप्तस्वकीयांना पैसे पाठविण्याचा अथवा मिळविण्याचा हा ‘मनीऑर्डर’पेक्षाही स्वस्त, सोपा व तत्पर उपाय ठरेल. ऑक्सिजन सव्‍‌र्हिसेस इंडिया प्रा. लि. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी एकत्र येऊन हा सेवा उपक्रम अलीकडेच मुंबईत समारंभपूर्वक दाखल केला. याप्रसंगी बोलताना ऑक्सिजनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रमोद सक्सेना यांनी सांगितले की, ‘ऑक्सिकॅश’ मनी ट्रान्सफर सेवा ही देशभरातील १०० हजारांहून अधिक ऑक्सिजन किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल, ज्यांच्या साहाय्याने बँकांपासून वंचित वर्गाला सहजपणे पैशाची देवाणघेवाण अल्पमोबदल्यात व तात्काळ करता येईल.