मुंबई : अर्थव्यवस्थेने गेल्या काही महिन्यांत मंदीसदृश वळण घेतले असताना, आदरातिथ्य क्षेत्रातील ओयो हॉटेल्स अँड होम्सची सर्वागीण प्रगती सुरू आहे. ओयोच्या देशभरातील पाहुण्यांसाठी खोल्यांची संख्या २.५ लाखांवर गेली असून, सहा महिन्यांपूर्वीपर्यंत ती १.७५ लाखांवर होती. खासगी लोकांच्या मालमत्तांवर विकसित जगातील तिसरी मोठी हॉटेल साखळी बनलेल्या ओयोने आता या मालमत्ताधारकांशी सख्य आणखी मजबूत करताना, त्यांना विस्तार, नूतनीकरण व दुरुस्तीसाठी आर्थिक मदत व वित्तपुरवठय़ाची योजना आखली आहे.

मालमत्ता भागीदारांसाठी विकसित केलेल्या ‘ओपन’ (ओयो पार्टनर एंगेजमेंट नेटवर्क) कार्यक्रमाचे अनावरण ओयो हॉटेल्स अँड होम्सने मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य घोष यांनी गुरुवारी मुंबईत केले. देशातील ३०० शहरांमधील १० हजारांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांचा नफा वाढू शकेल, असे विविधांगी साहाय्य व मूल्यवर्धित सेवा-सहयोग याद्वारे दिला जाणार आहे. जवळपास २००० मालमत्ताधारकांना सरलेल्या जून महिन्यांपर्यंत ६० कोटी रुपयांचे साहाय्य दिले गेले असून, ऑगस्टमध्ये आणखी १७० कोटी रुपयांचे वितरण होऊ घातले असल्याचे घोष यांनी स्पष्ट केले.

ही मदत व्यावसायिक नफ्यातील अग्रिम या रूपात पूर्णपणे बिनव्याजी आणि ओयोकडे उपलब्ध स्रोतातून दिली गेली आहे. या ‘कॅश इन बँक (सीआयबी)’ खेळत्या भांडवलाच्या सुविधेतून भागीदारांना मालमत्तेचा विस्तार, नविनीकरणाला मदत झाली असून, त्यातून त्यांचा व्यवसाय व नफ्याचे प्रमाणही वाढले असल्याचे घोष यांनी स्पष्ट केले. दक्षिण आशिया क्षेत्रातून असा एकंदर १,४०० कोटी रुपयांचा कोष भागीदारांच्या उत्कर्षांसाठी गुंतविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शिवाय, ‘ओपन’अंतर्गत भागीदारांना वाटाघाटीने कमी केलेल्या व्याजदरात कर्जसुविधा दिली जाणार असून, त्यासाठी सहा बँकेतर वित्तीय कंपन्यांबरोबर सामंजस्य केले गेले आहे. त्याचप्रमाणे बीएमडब्ल्यू आणि फोक्सव्ॉगन हे कार निर्माते आणि पेटीएमसह केलेल्या सामंजस्यातून भागीदारांना जीवनशैलीविषयक गरजांची पूर्तता, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व बँकिंग सेवांच्या गरजाही पूर्ण केल्या जाणार आहेत.