चालू आर्थिक वर्षांत कर महसुलाचे लक्ष्य गाठले जाईल याबाबत संपूर्ण आशावाद व्यक्त करीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी करप्रशासनाला बडय़ा १०० उत्पादन शुल्क करदात्यांवर तसेच कर-विवरण सादर करणे बंद केलेल्या १२ लाख सेवा-करदात्यांवर नजर ठेवण्याचा सूचना दिल्या. सेवा कराच्या क्षेत्रात कर-विवरण पत्र न भरणाऱ्या अथवा पूर्वी भरत असलेल्या पण सध्या न भरणे थांबविणाऱ्यांची संख्या वाढत जाणे आश्चर्यकारक नसले तरी त्यांची संख्या १२ लाखांच्या वर जाणे धक्कादायक असल्याचे चिदम्बरम यांनी याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
या विभागाचे महसूल गोळा करणे हे प्रधान कार्य असून, त्यांनी ५.६३ लाख कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कर महसुलाचे उद्दिष्ट गाठलेच पाहिजे, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी येथे बोलताना केले. हे लक्ष्य गाठले गेले तर प्रत्यक्ष कराचे लक्ष्यही गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठी १२.३५ लाख कोटी रुपयांचे कर-महसुलाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. गेल्या वर्षी ते १०.३८ लाख कोटी रुपये असे होते.
देशात अबकारी कराचे दाते अवघे १.२ लाख इतकेच असून, कोणत्याही कर व्यवस्थेतील हा सर्वात छोटा करदात्यांचा वर्ग आहे, त्यातही बडय़ा १०० करदात्यांचे योगदान जवळपास ८० टक्के इतके आहे. त्यांच्याकडून पुरेपूर वसुली होईल याकडे लक्ष द्यायला हवे.