पार्टिसिपेटरी नोट्स अर्थात ‘पी-नोट्स’च्या माध्यमातून होणारी भांडवली बाजारातील गुंतवणूक सप्टेंबरअखरे तिमाहीच्या उच्चांकावर पोहोचली आहे. व्यक्तिगत उच्च मालमत्ताधारक, हेज फंडधारक तसेच इतर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांमार्फत सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये या पर्यायाद्वारे गुंतवणूक केली जाते.
सप्टेंबर २०१४ अखेर ही गुंतवणूक एकूण २,२२,३९४ कोटी रुपये झाली आहे. ऑगस्टमध्ये ती २,११,४९९ कोटी रुपये होती. सरलेल्या जूनमधील २,२४,२४८ कोटी रुपयांच्या नजीक यंदा ती पोहोचली आहे. जूननंतर जुलैमध्ये ही गुंतवणूक घसरली होती. तर ऑगस्टच्या तुलनेत टक्केवारीत ती यंदा १०.७ ने उंचावली आहे. एकूण विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या तुलनेत पी-नोट्सद्वारे वर्षांला १५ ते २० टक्के गुंतवणूक होत आहे. २००७ मध्ये ती सर्वाधिक ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.e03 पी-नोट्स काय आहेत?
भारतात स्थायिक नसलेले मात्र भारतीय भांडवली बाजारात पैसा ओतू इच्छिणाऱ्यांसाठी हा गुंतवणुकीचा सोपा पर्याय आहे. बाजारातील समभाग, रोखे अथवा डेरिव्हेटिव्हजमध्ये पैसा गुंतविण्यासाठी अशा गुंतवणूकदारांना नियामकाकडे नोंदणी करण्याचीदेखील गरज नाही. सेबीने १९९२ मध्ये त्यांना नोंदणीकृत विदेशी संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.
२००७ मधील पी-नोट्स संकट
२००७ मध्ये भारतीय भांडवली बाजार उच्चांकाला असताना पी-नोट्स संकट उद्भवले होते. या दरम्यान विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा हिस्सा ५० टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर सेबीचे तत्कालीन अध्यक्ष एम. दामोदरन यांनी चिंता व्यक्त करत काहीसे र्निबध सुचविले होते. त्याचा नकारात्मक परिणाम लगेच दुसऱ्या दिवशी (१७ ऑक्टोबर २००७) मुंबई शेअर बाजार उघडताच १,७४४ अंशाच्या आपटीतून दिसून आला.