पंचवीस हजार रुपये पगार असलेल्या तरूणाला अचानक साक्षात्कार झाला की, तो 13 कंपन्यांच्या संचालक मंडळावर असून गेल्या काही महिन्यांत त्यानं 20 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्यातला एक व्यवहार हाँगकाँगमधल्या कंपनीनं केला असून तो 61 लाखांचा होता. दिल्लीतल्या लक्ष्मीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या व वॅगन आर गाडीतून फिरणाऱ्या एका फार्मा कंपनीत सेल्स एग्झिक्युटिव्ह असलेल्या अनुज कुमार श्रीवास्तवला हे आकडे ऐकून चक्करच यायची बाकी होती. या सगळ्या त्याच्या आर्थिक उलाढालींची कल्पना अनुज कुमारला प्राप्ती कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यावर आली.

प्राप्ती कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अनुज कुमारकडे त्याच्या उद्योगविश्वाची विचारणा केली त्यावेळी धक्का बसलेल्या अनुज कुमारला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले व त्याने दिल्ली पोलीस तसेच सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार केली. बोगस कंपन्यांनी अनुज कुमारचा पॅन नंबर वापरून विदेशामध्ये हे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीमध्ये अनुज कुमारनं तक्रार दाखल केली होती. अखेर, जुलैच्या अखेरीस दिल्ली हायकोर्टानं दिल्लीच्या आर्थिक गुन्हे विभागास या तक्रारीवर कार्यवाही करण्यास व एक सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. प्राप्तीकर खातेही हा प्रकार लक्षात घेऊन अनुज कुमारच्या मागे तगादा लावणार नाही अशी त्याची अपेक्षा आहे.

चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सुमेध कुमार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांमधली फसवणूक व विश्वास भंग अशा दोन प्रकरणांचा आर्थिक गुन्हे विभागानं तपास करावा. “माझं प्राप्तीकर विवरण पत्र बघून मला बँका पाच लाखांचं कर्जही मंजूर करत नाहीयेत. परंतु विचार करा या प्रकारामुळे मला माझे मित्र मात्र ‘बिझिनेस टायकून’ अशी हाक मारतात,” अनुज कुमार सांगतो.

प्राप्ती कर खात्याने पहिल्या तीन नोटिसी पाठवल्या तेव्हा त्यानं त्या गांभीर्यानं घेतल्या नाहीत. इतक्या मोठ्या रकमेच्या नोटिसी त्यांनी चुकून पाठवल्या असाव्यात असं त्याला वाटलं. ज्यावेळी प्राप्ती कर खात्याच्या अधिकाऱ्यानं अनुजला फोन केला व त्याच्या पॅनकार्डच्या हवाल्यानं 61 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे तसेच सॉफ्टवेअर आयात करण्यासाठी हाँगकाँगमधल्या कंपनीत पैसे पाठवण्यात आल्याचे सांगितले, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली व घटनेचे गांभीर्य समजले.

मग, सीएसोबत तो बँकेत गेला, ज्यावेळी सगळी ओळखपत्रे तपासण्यात आली व त्या व्यवहारामध्ये असलेली सही अनुज कुमारच्या सहीपेक्षा वेगळी असल्याचे समोर आले त्यावेळी अनुज कुमारनं दिल्ली पोलिसांमध्ये वकिलाच्या मदतीनं तक्रार केली. सीएनं जेव्हा अधिक तपास केला तेव्हा अनुज कुमारला 13 कंपन्यांच्या संचालक मंडळावर नेमण्यात आल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या पॅनकार्डचा वापर करून अनेक बोगस खाती उघडण्यात आल्याचे समोर आले. गेल्या सात महिन्यांत या खात्यांमधून 20 कोटी रुपयापर्यंतचे व्यवहारही करण्यात आल्याचे दिसून आले आहे. आता आर्थिक गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या आदेशामुळे करणार असून नक्की गुन्हेगार कोण आहेत हे समोर येईल व अनुज कुमारला दिलासा मिळेल अशी आशा आहे.