नवीन ‘न्यूट्रिकन्च’ श्रेणीत देशात पहिल्यांदाच ज्वारीची पौष्टिक बिस्किटे

मुंबई : आरोग्याबाबत दक्ष असलेल्या ग्राहकवर्गाला लक्ष्य करून पारले प्रॉडक्ट्सने आपल्या आरोग्यदायी पाचक बिस्किटांच्या श्रेणी विस्तार करीत त्यात न्यूट्रिकन्च पाचक बिस्किटांचे (डायजेस्टिव्ह कुकीज) तीन प्रकार बाजारात आणले आहेत. यातून पहिल्या वर्षांत या बाजारवर्गाचा १० टक्के हिस्सा, म्हणजे साधारण ३५० कोटींच्या विक्री महसुलाचे लक्ष्य कंपनीने राखले आहे.

पारलेने ही नवीन श्रेणी प्रीमियम प्रकारातील प्लॅटिना या उपविभागामार्फत बाजारात आणली आहे. पौष्टिकता आणि पाचनास उत्तम या वैशिष्टय़ांवर विशेष भर देऊन या आरोग्यदायी बिस्किटांच्या या श्रेणीची बाजारात विक्री केली जाणार आहे, असे पारले प्रॉडक्ट्स लि.चे विपणनप्रमुख मयांक शहा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

न्यूट्रिकन्च श्रेणीतील उत्पादने ही मेदरहित आणि अत्यल्प साखरेचा वापर केलेली असून, या श्रेणीत देशात प्रथमच ज्वारीपासून बनविलेली बिस्किटे आहेत. या बहुगुणी पारंपरिक भरडधान्याकडे लोकांनी पुन्हा वळावे या उद्देशाने हे उत्पादन बनविले गेले असून, लोकांच्या ते पसंतीसही उतरेल, असा शहा यांचा दावा आहे.

देशांतर्गत बिस्किटांची बाजारपेठ तब्बल ३,२०० कोटी रुपयांची असून, त्यात आरोग्यदायी बिस्किटांची श्रेणीची उलाढाल १,२०० कोटी रुपयांची आहे. ही श्रेणी वार्षिक १० ते १२ टक्के दराने वाढत असून, न्युट्रिकन्चची बाजारातील विक्रीही याच दराने वाढेल आणि पहिल्या वर्षी १० टक्के बाजारहिस्सा ती कमावेल, असा शहा यांनी विश्वास व्यक्त केला.

पारले प्रॉडक्ट्सच्या एकूण महसुलात १५ टक्के योगदान असलेल्या प्लॅटिना या प्रीमियम बिस्किटांच्या उपविभागाची वार्षिक २५ टक्के वृद्धीदराने प्रगती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.