भांडवली बाजारातील ‘पार्टीसिपॅटरी नोट्स’च्या माध्यमातून वैयक्तिक उच्च मालमत्ता जोपासणाऱ्या गुंतवणूकदारांचा निधी गेल्या महिन्यात १० महिन्यांच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे. सप्टेंबरमधील या माध्यमातून होणारी गुंतवणूक २८ अब्ज डॉलर म्हणजेच १.७१ लाख कोटी रुपये झाली आहे.
भांडवली बाजारात इक्विटी, डेट आणि डेरिव्हेटिव्हज या सारख्या पर्यायात श्रीमंत आणि विदेशी गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत असतात. यंदाच्या सप्टेंबरमध्ये ही गुंतवणूक मोठी ठरली आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१२ नंतरची ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. तेव्हा १.७७ लाख कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. तर यंदाच्या ऑगस्टमध्ये पी-नोट्सद्वारे गुंतवणूक १.६५ लाख कोटी रुपये होती.
देशातील एकूण विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांपैकी पी-नोट्सचा हिस्सा १५ ते २० टक्के असतो. २००७ मध्ये सेन्सेक्स तेजीच्या लाटेवर स्वार असताना हे प्रमाण ५० टक्के होते. याबाबत सेबीच्या र्निबधानंतर हे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. गेल्या महिन्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर डेट बाजारपेठेतून त्यांनी याच सप्टेंबरमध्ये ५,६०० कोटी रुपये काढूनही घेतले आहेत.