देशातील कारच्या विक्रीने यंदा घसरलेल्या इंधनाच्या किमतीचा परिणाम म्हणूनही काहीशी वाढ दाखवून, घसरणीची पाठ अखेर सोडली. नुकत्याच सरलेल्या २०१४-१५ आर्थिक वर्षांत देशांतर्गत कार विक्री ४.९९ टक्क्यांनी बहरली आहे. आधीच्या सलग दोन वर्षांत मात्र कारची विक्री यापेक्षा जास्त प्रमाणात घसरत आली होती.
वाहन उत्पादकांची संघटना ‘सियाम’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या २०१४-१५ आर्थिक वर्षांत १८,७६,०१७ कार विकल्या गेल्या, ज्यांचे प्रमाण त्या आधीच्या वर्षांत १७,८६,८२६ असे होते. प्रत्यक्षात २०१३-१४ मध्ये कार विक्री आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४.६५ टक्क्यांनी घटली होती. तर २०१२-१३ मध्ये जरी १८,७५,०५५ कार विकल्या गेल्या असल्या तरी ही विक्रीही २०११-१२ च्या तुलनेत तब्बल ६.९९ टक्क्यांनी घसरली होती.
गेल्या वर्षांत अबकारी शुल्कात दिलेल्या सवलतींनी कारच्या किमती खाली राहिल्या, तर पेट्रोल-डिझेल इंधनाच्या किमतीही वाढण्याऐवजी घसरल्या. तर नजीकच्या काळात व्याजाचे दरही नरमण्याचे संकेत वगैरे घटक हे कार खरेदीबाबत सामान्य ग्राहकांमध्ये मनोभावना निर्माण करण्यास आणि प्रत्यक्ष खरेदीच्या निर्णयालाही कारणीभूत ठरल्याचे ‘सियाम’चे म्हणणे आहे.
सरलेल्या आर्थिक वर्षांत दुचाकींसह देशांतर्गत एकूण वाहनविक्री ७.२२ टक्क्यांनी उंचावली आहे. दुचाकींमध्ये सर्वाधिक वाढ ही स्कूटर्सच्या विक्रीत दिसली. २०१४-१५ मध्ये एकूण १,६०,०४,५८१ स्कूटर्स विकल्या गेल्या, ज्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ८.०९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर १०७,४३,५४९ विकल्या गेलेल्या मोटरसायकल्समधील वार्षिक वाढीचे प्रमाण २.५० टक्के आहे. मोटरसायकल्सची विक्री सपाट राहण्याचे कारण हे ग्रामीण भागातून अपेक्षित मागणी न येणे हे असल्याचे ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.

सरलेले २०१५ आर्थिक वर्ष हे वाहन उद्योगांसाठी अपेक्षेप्रमाणे कलाटणी देणारे वर्ष राहिले. जुन्या चिंता बव्हंशी सरल्या असून, गुंतवणुकीचे चक्रही रुळावर येत आहे. ग्राहकांमध्ये बदललेल्या खरेदीप्रवण मनोभावना संपूर्ण उद्योगक्षेत्रासाठी मोठा उसासाच ठरेल.
-विष्णू माथूर, महासंचालक, सियाम