देशातील प्रवासी वाहन विक्री सलग ११ व्या महिन्यात घसरली आहे. सण-समारंभाच्या कालावधीतही खरेदीदारांनी नव्या वाहनांकडे पाठ वळविली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत देशातील एकूणच वाहन क्षेत्राची कामगिरी निर्यात वगळता विक्रीबाबत सुमार ठरली आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान सर्व गटांतील वाहनांची देशांतर्गत विक्री दुहेरी अंकात घसरली आहे. तर प्रवासी गटातील वाहनांची देशाबाहेरची निर्यात मात्र एकेरी अंकात वाढली आहे. व्यापारी व तीनचाकी वाहनांची निर्यात मात्र उणे राहिली आहे.

‘सिआम’ या वाहननिर्मिती कंपन्यांच्या संघटनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या सप्टेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहन विक्री २३.६९ टक्क्यांनी घसरून २,२३,३१७ झाली आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीत या गटातील वाहन विक्री २३.५६ टक्क्यांनी कमी नोंदली गेली आहे.

प्रवासी वाहनांनी ऑगस्टमध्ये ३१.५७ टक्के घसरणीसह १,९६,५२४ विकल्या गेलेल्या वाहनांसह दोन दशकांतील सर्वाधिक विक्रीतील घसरण नोंदविली होती. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीदेखील ३३.४ टक्क्यांनी घसरून १,३१,२८१ झाली आहे. तर मोटरसायकलची विक्री दोन दशकांतील नीचांकी आणि व्यापारी वाहनांची विक्री दशकातील किमान स्तरावर नोंदली गेली आहे.

मोटरसायकल विक्री २३.२९ टक्क्यांनी तर एकूण दुचाकी विक्री २२.०९ टक्क्यांनी घसरली आहे. व्यापारी वाहन विक्रीत यंदाच्या सप्टेंबरमध्ये ३९.०६ टक्के घसरण झाली आहे. सर्व गटांतील मिळून वाहने २२.४१ टक्के घसरणीसह २०.०४ लाखांवर येऊन ठेपली आहे.

एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान दुचाकी विक्रीत १६.१८ टक्के, तर एकूण व्यापारी वाहन विक्रीत २२.९५ टक्के घसरण झाली आहे. प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांमध्येही सहामाहीत एकेरी अंक विक्री घसरण झाली आहे.

प्रवासी वाहन आणि दुचाकी क्षेत्राचा निर्यातीचा प्रवास मात्र गेल्या सहामाहीत काही प्रमाणात वाढता राहिला आहे. हे दोन्ही वाहन गट प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढले आहेत. एकूण वाहन निर्यातही १.२९ टक्क्यांनी वाढली आहे. तर व्यापारी व तीनचाकी वाहन निर्यात अनुक्रमे तब्बल ४१.५८ व ११.५९ टक्क्यांनी कमी झाली आहे.