05 July 2020

News Flash

प्रवासी वाहन विक्रीचा घसरण तिघाडा!

यंदाच्या जानेवारीत स्कूटर विक्री १०.२१ टक्क्य़ांनी कमी होऊन ४.९७ लाख झाली.

(संग्रहित छायाचित्र)

वर्षांरंभी खरेदीदारांची उदासीनता *  अर्थसंकटाने प्रतिसादात निरुत्साह * इंधनदर भडक्याचाही परिणाम

नवी दिल्ली : बिगर बँकिंग वित्त कंपन्यांमधील अर्थसंकट, इंधनाच्या चढय़ा किंमती आणि सूट-सवलतींबाबत विक्रेत्यांकडून नसलेला हातभार याचा फटका देशांतर्गत वाहन विक्रीवर वर्षांरंभीच नोंदला गेला आहे जानेवारीत प्रवासी वाहन विक्री १.८७ टक्क्य़ांनी रोडावत सलग तिसऱ्या महिन्यात निराशाजनक कामगिरी बजाविणारी ठरली आहे. २०१९ च्या पहिल्या महिन्यात २.८० लाख प्रवासी वाहन विक्री झाली आहे.

वर्षभरापूवी, जानेवारी २०१८ मध्ये देशांतर्गत एकूण प्रवासी वाहन विक्रीचा आकडा २,८५,४६७ होता. तर या गटातील केवळ कारची विक्रीदेखील सलग तिसऱ्या महिन्यात खाली आली आहे. ती गेल्या महिन्यात २.६५ टक्क्य़ांनी कमी होत १,७९,३८९ झाली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती १,८४,२६४ होती.

नववर्षांपासून अनेक कंपन्यांनी त्यांच्या विविध गटातील वाहनांच्या किंमती वाढविल्या होत्या. येणाऱ्या सणांच्या पाश्र्वभूमीवर विक्रेत्यांनीही आहे त्या वाहनांचा साठा संपवून नव्या वाहनांची मागणी करण्याच्या धोरणाचाही हा परिणाम होता. गेल्या महिन्यात काही कंपन्यांनी नवी वाहने बाजारपेठेत सादर केली. मात्र महिनाअखेरिस आल्याने त्याचा योग्य परिणाम नोंदले जाणे प्रतिक्षित आहे.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीच्या प्रवासी वाहन विक्रीत अवघी ०.१८ टक्के वाढ झाली. या दरम्यान कंपनीने १.३९ लाख वाहनांची विक्री केली. तर स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर इंडियाच्या वाहनांची विक्री अवघ्या ०.६५ टक्क्य़ाने वाढत ४५,८०३ झाली. महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री ०.८८ टक्क्य़ाने वाढून २३,८६४ झाली. तर होंडा कार्स इंडियाची विक्री थेट ५१.६७ टक्क्य़ाने झेपावत १४,३८३ झाली.

वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘सिआम’नुसार, जानेवारी २०१९ मध्ये दुचाकी विक्री ५.१८ टक्क्य़ांनी घसरत १५.९७ लाख झाली. तर या गटातील मोटरसायकलची विक्री २.५५ टक्क्य़ांनी खाली येत १०.२७ लाख नोंदली गेली आहे. गेल्या महिन्यात हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने घसरण तर बजाज ऑटोने विक्रीतील वाढ राखली आहे.

यंदाच्या जानेवारीत स्कूटर विक्री १०.२१ टक्क्य़ांनी कमी होऊन ४.९७ लाख झाली. या गटात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, टीव्हीएसला घसरण फटका बसला. तर सुझुकी मोटरसायकल इंडियाने तब्बल ६०.२८ टक्के विक्री गती नोंदविली. गेल्या महिन्यात व्यापारी वाहनांची विक्री २.२१ टक्क्य़ांनी वाढत ८७,५९१ झाली. तर सर्व गटातील मिळून वाहन विक्री जानेवारी २०१९ मध्ये ४.६८ टक्क्य़ाने खाली येत २०.१९ लाख झाली.

१० महिन्यातील निर्मितीवाढ १० टक्के

एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या १० महिन्यांमध्ये प्रवासी कार, व्यापारी वाहने, तीन चाकी तसेच दुचाकी वाहनांची निर्मिती २.६२ कोटी झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत सर्व गटातील एकूण वाहनांचे उत्पादन २.३९ कोटी होते. तर गेल्या १० महिन्यांमध्ये वाहन निर्यात १६.७७ टक्क्य़ांनी विस्तारी आहे. एकूण वाहनांमध्ये प्रवासी वाहने वगळता इतर सर्व गटातील वाहनांची निर्यात या दरम्यान वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 1:51 am

Web Title: passenger vehicle sales decline
Next Stories
1 ‘यूपीएल’कडून ‘आर्यस्टा’चे अधिग्रहण
2 सरकारी बँकांच्या बुडीत कर्जामध्ये घसरण
3 बाजार-साप्ताहिकी : वाटचाल सध्या तरी आशादायी!
Just Now!
X