नवी दिल्ली : देशातील प्रवासी वाहनांची विक्री नोव्हेंबरमध्ये घसरली आहे. जुलैनंतर सलग चौथ्या महिन्यात खरेदीदारांनी पाठ दाखविली आहे. ऐन सण-समारंभात वाहन उत्पादक कंपन्यांना याचा फटका बसला आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘सिआम’ (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ने गेल्या महिन्यातील वाहन विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर करताना नोव्हेंबरमध्ये एकूण प्रवासी वाहन विक्री २,६६,००० झाली असल्याचे म्हटले आहे. वर्षभरापूर्वीच्या, २,७५,४४० वाहनांच्या तुलनेत ही संख्या ३.४३ टक्क्य़ांनी रोडावली आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रवासी वाहन विक्री १.५५ टक्क्य़ांनी वाढली होती. तीन महिन्यातील घसरण यारूपात थांबली होती. तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये वाहन विक्री अनुक्रमे २.७१, २.४६ व ५.६१ टक्क्य़ांनी घसरली होती.

इंधनाच्या वाढत्या किंमती, चढे व्याजदर आदींचा विपरित परिणाम वाहनांच्या विक्रीवर होत असल्याचे मत सिआमचे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांच्या किंमती कमी होत असून जागतिक स्तरावरील स्थिरतेचाही सकारात्मक परिणाम येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय वाहन बाजारपेठेवर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जानेवारी २०१९ अनेक कंपन्यांनी त्यांच्या विविध गटातील वाहनांच्या किंमती वाढविण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये मारुती सुझुकी, स्कोडा, टोयोटा किलरेस्कर यांचा समावेश आहे.