वाहन उद्योगासाठी दसरा-दिवाळी निरुत्साहीच..

नवी दिल्ली : सणोत्सव असूनही गेला महिना वाहन उत्पादक कंपन्यांसाठी निराशाजनकच गेला. ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत वार्षिक तुलनेत अवघी १.५५ टक्के भर पडली आहे.

ऑक्टोबरमधील किरकोळ वाहन विक्रीतील वाढीमुळे मात्र गेल्या सलग तीन महिन्यांतील घसरणीला पायबंद घातला गेला. यापूर्वी जुलैपासून सातत्याने वाहन विक्रीत घसरण सुरू होती.

ऑक्टोबरमधील दसऱ्यानिमित्त वाहन उत्पादक कंपन्यांना वाढीव विक्रीबाबत फार आशा होती. अनेक कंपन्यांनी तर यानिमित्ताने त्यांची नवी वाहनेही सादर केली होती. यामध्ये खरेदीदारांच्या पसंतीच्या एसयूव्हीचाही समावेश होता.

‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) या वाहन उत्पादकांच्या संघटनेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये २,८४,२२४ प्रवासी वाहने विकली गेली.

यापूर्वी जुलैमध्ये २.७१ टक्के, ऑगस्टमध्ये २.४६ टक्के तर सप्टेंबरमध्ये तब्बल ५.६१ टक्के प्रवासी वाहन विक्रीतील घसरण नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१७ मध्ये २,७९,८७७ प्रवासी वाहनांची विक्री झाली.

एकूण प्रवासी वाहनांबरोबरच कार विक्रीतही किरकोळ, ०.३८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्या महिन्यात १,८५,४०० कारची विक्री झाली. वर्षभरापूर्वी ती किरकोळ कमी १,८४,७०६ होती. यावरून नव्या उत्पादनांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट होते.

ऑक्टोबरमध्ये दुचाकी विक्री १७.२३ टक्क्यांनी वाढून २०,५३,४९७ झाली आहे. तर त्यातील मोटरसायकल प्रकारातील वाहनांची विक्री २०.१४ टक्क्यांनी वाढून १३,२७,७५८ झाली. गेल्या महिन्यात ६,४३,३८२ गिअरलेस स्कूटर वाहने विकली गेली.

ऑक्टोबरमध्ये व्यापारी वाहनांमधील वाढ २४.८२ टक्के नोंदली गेली असून त्यांची संख्या ८७,१४७ पर्यंत पोहोचली आहे. चालू संपूर्ण वर्षांसाठी एकूण प्रवासी वाहन विक्रीचा वेग ७ ते ९ टक्के असेल, असे वाहन उत्पादक संघटनेला वाटते.

सर्व गटांतील वाहने मिळून गेल्या महिन्यात २४.९४ लाख वाहने विकली गेली आहेत. वार्षिक तुलनेत त्यात १५.३३ टक्के वाढ झाली आहे. वाढते इंधन दर, विम्याची रक्कम यामुळे विक्री मंदावल्याचे ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर म्हणाले.

एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यात एकूण प्रवासी वाहन विक्री ६.१० टक्क्यांनी वाढून २०.२८ लाखांवर पोहोचली आहे. दिवाळीनिमित्ताने नोव्हेंबरमध्ये वाहन विक्री वाढण्याबाबत कंपन्यांना आशा आहे.