नवी दिल्ली : देशातील प्रवासी वाहन विक्रीत जानेवारी २०२० मध्ये ५ टक्के घसरण नोंदली गेली आहे. वाहन विक्री वितरणाच्या संघटनेने गुरुवारी जाहीर केल्यानुसार जानेवारीत एकूण प्रवासी वाहन विक्री २,९०,८७९ झाली आहे. वार्षिक तुलनेत ही घसरण ४.६१ टक्के आहे.

‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’ अर्थात ‘फाडा’च्या म्हणण्यानुसार, वर्षभरापूर्वी, जानेवारी २०१९ मध्ये एकूण प्रवासी वाहन विक्री ३,०४,९२९ होती. देशभरातील १,४३२ प्रादेशिक वाहतूक कार्यालयांतून (आरटीओ) ‘फाडा’ संघटनेच्या दफ्तरी नोंद असलेल्या १,२२३ प्रादेशिक वाहतूक कार्यालयात नोंदणी झालेल्या वाहन विक्रीतून ताजी आकडेवारी समोर आली आहे. देशातील सर्वच गटातील वाहने मिळून ७.१७ टक्के घसरणीसह विक्री संख्या १७,५०,११६ झाली आहे. वर्षभरापूर्वी ती १८,८५,२५३ होती.

गेल्या महिन्यात दुचाकी विक्री ८.८२ टक्क्य़ांनी घसरून १२,६७,३६६ झाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये ती १३,८९,९५१ होती. तर वाणिज्य वाहनांची विक्री ६.८९ टक्क्य़ांनी रोडावत ८२,१८७ झाली आहे. वर्षभरापूर्वी ८८,२७१ वाणिज्य वाहन विक्री झाली होती. तर तीन चाकी वाहनांची संख्या मात्र वाढून ६३,५१४ झाली आहे. जानेवारी २०१९ मधील ५८,१७८ तीन चाकी वाहनांच्या तुलनेत यंदा त्यात ९.१७ टक्के वाढ नोंदली गेली आहे.