सरलेल्या ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांची एकूण २,१५,९१६ च्या घरात विक्री झाल्याचे, या भारतातील वाहन निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘सियाम’ने शुक्रवारी स्पष्ट केले. ऑगस्ट २०१९ मधील विक्री कामगिरीच्या तुलनेत यंदाची विक्री १४.१६ टक्के अधिक आहे.

ऑगस्टमधील विक्रीतील वाढ ही जरी गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट २०१९ मध्ये लक्षणीय मंदावलेल्या विक्रीला आधार मानून, त्या तुलनेत असली तरी ती घसरणक्रम खंडित करणारा शुभसंकेत देणारी असल्याचे ‘सियाम’ने स्पष्ट केले आहे. विशेषत: आगामी सणासुदीच्या काळात हा विक्रीतील बहर कायम राहण्याचा आशावाद त्यामुळे या उद्योगक्षेत्रात बळावला आहे.

सलग नऊ महिने विक्रीत घसरणीचे धक्के सोसत असलेल्या वाहन उद्योगासाठी ऑगस्टमधील विक्रीत नोंदवली गेलेली वाढ सुखकारक ठरली आहे. गेली दोन-अडीच वर्षे वाहन उद्योगाला बाजारपेठेतील मागणीतील घसरणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीने वाढीची मात्रा गाठली होती. मात्र त्या आधीचे सलग ११ महिने विक्रीत निरंतर घसरणीचा क्रम सुरू होता. २०१८ सालाच्या तुलनेत २०१९ मध्ये प्रवासी वाहनांच्या आणि दुचाकींच्या विक्रीतील वार्षिक घट ही अनुक्रमे ३२ टक्के आणि २२ टक्के अशी राहिली आहे.

केवळ स्कूटरचा अपवाद केल्यास, प्रवासी वाहनांच्या सर्वच प्रकारात ऑगस्ट महिन्यात वाढ नोंदविली गेली आहे. सर्वाधिक १५.५४ टक्के वाढ ही बहुपयोगी वाहन प्रकाराने नोंदविली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये ७०,८३७ एसयूव्हींची विक्री झाली होती, तर यंदाच्या ऑगस्टमधील विक्री ८१,८४२ इतकी आहे. प्रवासी कारची १,२४,७१५ इतकी मासिक विक्रीही १४.१३ टक्के वाढ दर्शविते. व्हॅनची विक्री ३.८२ टक्के वाढीसह ९,३५९ इतकी आहे.

दुचाकींची एकूण विक्री ऑगस्टमध्ये ३ टक्के वाढली असली तरी, त्यात १०.१३ टक्के वाढीचे योगदान मोटरसायकलचे आहे. १०,३२,४३७ मोटरसायकल या महिन्यात विकल्या गेल्या, तर ४,५६,८४८ इतकी स्कूटरची विक्री ही मागच्या वर्षांच्या तुलनेत १२.३ टक्के घट दर्शविणारी आहे.

विक्रीतील वाढ ही एकूण उद्योगक्षेत्रासाठी आश्वासक असून, मुख्यत: आगामी सणासुदीला पाहता दुचाकी आणि प्रवासी कारच्या विक्रीला आलेला बहर हा उत्साहवर्धकच आहे.

– केनिची आयुकावा, अध्यक्ष-सियाम