19 November 2019

News Flash

प्रवासी वाहन विक्रीला घरघर

कमालीच्या मंदावलेल्या मागणीमुळे देशातील वाहन निर्मिती क्षेत्राला उत्पादनांत कपातीचा मर्गा अनुसरावा लागत आहे

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक २० टक्क्य़ांची मे महिन्यात घसरण

चिंतातुर उत्पादकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा

कमालीच्या मंदावलेल्या मागणीमुळे देशातील वाहन निर्मिती क्षेत्राला उत्पादनांत कपातीचा मर्गा अनुसरावा लागत आहे. सरलेल्या म महिन्यात तर प्रवासी वाहनांची विक्री तब्बल २० टक्क्यांनी घसरून मागील १८ वर्षांच्या तळात पोहोचली आहे.

कमी मागणीमुळे मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्रसह अनेक कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. विक्रीत घसरणीचा फटाका टाटा मोटर्ससह काही आघाडीच्या कंपन्यांना बसला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्रीतील घसरणीचा सामना करावे लागत असलेल्या वाहन निर्मात्या कंपन्यांनी या क्षेत्राच्या उभारीसाठी सरकारकडून प्रोत्साहनपर मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सलग सातव्या महिन्यात घसरणीचा क्रम पुढे सुरू राखत यंदाच्या मेमध्ये वाहन विक्रीने विक्रमी तळ दाखविला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ३,०१,२३८ वाहने विकली गेली होती, तर मे २०१९ मध्ये विक्रीचे प्रमाण २,३९,३४७ इतके झाले आहे. सप्टेंबर २००१ मध्ये दिसलेल्या घसरणीनंतरची विक्रीतील सर्वाधिक घसरण ठरली आहे.

यापूर्वी सणोत्सवांचा ऑक्टोबर २०१८ हा प्रवासी वाहनांमध्ये विक्रीत वाढ नोंदविणारा महिना ठरला आहे. यंदाची घसरण ही मे २०१९ मध्ये प्रवासी वाहनांसह सर्वच गटातील वाहनांमध्ये घसरण झाली आहे. यामध्ये दुचाकी आणि व्यापारासाठी वापरावयाच्या तीन चाकी, चार चाकी वाहनांचाही समावेश आहे.

‘सिआम’ या वाहन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेंच्या आकडेवारीनुसार, मेमध्ये देशांतर्गत कार विक्री २६.०३ टक्क्यांनी घसरून १,४७,५४६ पर्यंत आली आहे. तर मोटरसायकल विक्री ४.८९ टक्क्यांनी कमी होत ११,६२,३७३ झाली आहे. एकूण दुचाकी विक्री ६.७३ टक्क्यांनी घसरून १७,२६,२०६ झाली आहे. तर व्यापारी वाहनांची विक्री १०.०२ टक्क्यांनी घसरत ६८,८४७ नोंदली गेली आहे. सर्व गटातील वाहने मिळून ८.६२ टक्के घसरणीसह २०,८६,३५८ झाली आहेत. मेमध्ये कंपन्यांनी ८ टक्क्यांपर्यंतची वाहन निर्मिती कपात केली होती.

याबाबत ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले की, वाहन विक्रीत मेमध्येही सलगपणे घसरण नोंदली गेली. वाहन विक्रीतील घाऊक घसरणीपोटी कंपन्यांनाही उत्पादन कमी करावे लागले. गेल्या १५ वर्षांत अशी मंदी या क्षेत्राने प्रथमच अनुभवली आहे. या क्षेत्राच्या उभारीसाठी सरकारने आता ठोस उपाययोजना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असेही ते म्हणाले. २००८-०९ आणि २०११-१२ मध्ये उत्पादन शुल्क कपातीच्या रूपात असे सहकार्य या उद्योगाला मिळाले होते, याची आठवणही माथूर यांनी करून दिली. तर संघटनेचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी, सर्व वाहन श्रेणीतील वस्तू व सेवा कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सूचना केली आहे.

घाऊक घसरणीपोटी कंपन्यांना उत्पादन कमी करावे लागत आहे. गेल्या १५ वर्षांत अशी मंदी हे क्षेत्र प्रथमच अनुभवत आहे. म्हणूनच या क्षेत्राच्या उभारीसाठी सरकारने ठोस उपाययोजना, त्याही ताबडतोब  करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

विष्णू माथूर

‘सिआम’चे महासंचालक

First Published on June 12, 2019 1:17 am

Web Title: passenger vehicles sale less in this year
Just Now!
X