७ मेपर्यंत व्यवहार मार्गी लावण्यासाठी मुदत

मुंबई : बाबा रामदेवप्रणीत पतंजली आयुर्वेदच्या पहिल्या अधिग्रहण प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून, खाद्यतेलाच्या निर्मितीतील कर्जअरिष्टाने ग्रस्त रुची सोया लिमिटेडसाठी तिच्या ४,३५० कोटी रुपयांच्या बोलीला कर्जदात्या बँकांकडून मंगळवारी मंजुरी देण्यात आली. येत्या ७ मेपर्यंत पतंजलीला हा व्यवहार मार्गी लावावा लागणार आहे.

रुची सोया इंडस्ट्रीजने विविध बँकांचे तब्बल ९,३४५ कोटी रुपये थकविले असून, पतंजलीच्या ४,३५० कोटी रुपयांच्या सुधारित बोलीला स्टेट बँकेच्या नेतृत्वातील कर्जदात्या बँकांच्या संघातील ९६ टक्के असे मताधिक्याने मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. यातून बँकांना जवळपास ५१ टक्के थकीत कर्जावर पाणी सोडावे लागणार आहे.

कर्जदात्या बँकांनी पतंजलीच्या बोलीला दिलेल्या मंजुरीनंतर, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने या व्यवहाराचे निराकरण करण्यासाठी ७ मेपर्यंत मुदत देत असल्याचा बुधवारी निर्णय दिला आणि या प्रकरणी पुढील सुनावणी त्याच दिवशी करण्याचेही मुक्रर केले.

बाबा रामदेव यांनी प्रारंभिक ४,१६० कोटी रुपयांची बोली लावली होती, ज्यात खेळत्या भांडवलापोटी गुंतवणूक करावयाच्या १,७०० कोटी रुपयांचाही समावेश होता. रुची सोयाच्या ताब्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीतून अदानी विल्मरने माघार घेत असल्याचे जाहीर केले, त्या पश्चात आता पतंजली हा चढाओढीत शिल्लक राहिलेला एकमेव स्पर्धक होता. गेल्या महिन्यात प्रारंभिक बोली आणखी १९० कोटी रुपयांनी वाढवून पतंजलीने ती ४,३५० कोटी रुपयांवर नेली.

न्यूट्रेला, महाकोश, सनरिच, रुची स्टार आणि रुची गोल्ड अशा रुची सोयाच्या खाद्यतेलाच्या नाममुद्रा बाजारात प्रचलित असून, देशभरात अनेक ठिकाणी तिचे उत्पादन प्रकल्प आहेत. ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर पतंजली ही सोयाबीन तेलाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादक बनू शकणार आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीबीएस बँक यांनी रुची सोयाच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी केलेला अर्ज दाखल करून घेतला आहे. स्टेट बँकेचे सर्वाधिक १,८०० कोटी रुपये कंपनीने थकविले असून, ताज्या निराकरण व्यवहारापश्चात सर्वाधिक तूटही स्टेट बँकेच्याच वाटय़ाला येणार आहे.